(मंडणगड /रत्नागिरी)
केळवत घाटातील उतारावरील धोकादायक वळणावर मारुती ब्रीझा कार आणि दुचाकी यांच्यात समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात तिघे जण जखमी झाले. यामध्ये दुचाकीस्वार राजु नबीसाब मुल्ला (वय ५२) यांच्यासह त्यांच्यासोबत प्रवास करणारे दोन कामगार जखमी झाले आहेत. या अपघातप्रकरणी पुणे येथील कारचालक आशुतोष अशोक पंढरपुरकर (वय ५४) यांच्याविरोधात मंडणगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजु नबीसाब मुल्ला हे आपल्या कामावर असलेल्या देवकुमार मेहलाल खैरवाल (वय २७) आणि जैमुद्दीन आनु शेख (वय ४२) यांना दुचाकीवरून (एमएच ०८ एक्स ७३५७) घेऊन मंडणगडच्या दिशेने जात होते. ७ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास त्यांची दुचाकी केळवत घाटातील उतारावरील वळणावर आली असता, समोरून येणाऱ्या आशुतोष पंढरपुरकर यांच्या मारुती ब्रीझा कारने (एमएच १२ झेडएस ५२४७) दुचाकीला जोरदार धडक दिली.
या धडकेत दुचाकीवरील तिघांनाही लहान-मोठ्या तसेच गंभीर स्वरूपाच्या दुखापती झाल्या. याप्रकरणी जखमी राजु मुल्ला यांचे भाऊ मेहबुब नबीसाब मुल्ला (वय ४९, रा. पालघर, ता. मंडणगड) यांनी १२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४.२१ वाजता मंडणगड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार कारचालक आशुतोष अशोक पंढरपुरकर यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २८१, १२५ (अ), १२५ (ब) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघाताचा पुढील तपास मंडणगड पोलीस करीत आहेत.


