(रत्नागिरी / वार्ताहर)
आध्यात्म मंदिरात केवळ आनंद आणि उत्साह मिळवण्यासाठी न येता मनातील विवंचना दूर करण्यासाठी, थकलेल्या व दुर्बल मनाला प्रफुल्लित करून नव्या ऊर्जेची अनुभूती घेण्यासाठी यावे. त्यासाठी अशा केंद्राची आवश्यकता असून हे एक ऊर्जा केंद्र आहे. आपण अनन्यभावनेने प्रार्थना केली तर सद्गुरु ती ऐकून घेतात, असे प्रतिपादन कणेरीच्या सिद्धगिरी मठाचे मठाधिपती श्री. स. स. काडसिद्धेश्वर स्वामी यांनी केले.
शहराजवळील मजगाव रोड-लक्ष्मीनगर, प्लॉट क्र. १ येथे मंगळवारी श्री. स. स. काडसिद्धेश्वर आध्यात्म केंद्र व भक्त निवासाच्या उभारणीची पायाभरणी मठाधिपती श्री. स. स. काडसिद्धेश्वर स्वामी यांच्या हस्ते करण्यात आली. या वेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. श्री. स. स. काडसिद्धेश्वर भक्तमंडळाच्या वतीने कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला २०० हून अधिक भक्त मंडळी उपस्थित होती.
कार्यक्रमाची सुरुवात गणेशपूजनाने झाली. स्वामीजींचे आगमन झाल्यानंतर त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर त्यांच्या हस्ते विधीवत शिळापूजन आणि पायाभरणी करण्यात आली. यानंतर स. स. काडसिद्धेश्वर स्वामी यांनी उपस्थित भक्तांना आशीर्वादपर मार्गदर्शन केले. यावेळी भक्तमंडळींनी आध्यात्म मंदिराच्या उभारणीसाठी यथाशक्ती दान समर्पित केले.
स. स. काडसिद्धेश्वर स्वामी म्हणाले की, सद्गुरुंचा आशीर्वाद असेल तर सर्व काही पूर्ण होणार असून हे आध्यात्म मंदिरही उभे राहणार आहे. ज्या पद्धतीने आपण मेहनत घेऊन आपले घर पूर्ण करतो, त्याचप्रमाणे हे मंदिर उभारण्यासाठी भक्तांनी सढळ हस्ते मदत केली आहे. हे स्वधर्म स्थान असून असे धर्मस्थळ उभे करणे आवश्यक आहे.
आपण कोणतेही बजेट निश्चित करून काम करत नाही. सद्गुरुंच्या आशीर्वादाने आतापर्यंत शेकडो कोटींची कामे करण्यात आली आहेत. आता कोल्हापुरात व्हेटर्नरी कॉलेज बांधायचे असून त्यासाठी सव्वालाख चौरस फुटांची इमारत उभारावी लागणार आहे. त्यासाठी ३०-३५ कोटी रुपये आवश्यक असून नंतर फर्निचर, मशिनरी व इतर बाबींचा खर्च धरल्यास ही रक्कम ४०-४५ कोटी रुपयांपर्यंत जाईल, असे त्यांनी सांगितले.
भूमीपूजनावेळी खिशात पैसे नव्हते. मात्र, त्यावेळी एका उद्योजकाने सीएसआरमधून १ कोटी रुपये आणून दिले. त्यामुळे आपण चिंता करू नये. इमारत पूर्ण होईपर्यंत निधी मिळत राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. श्रद्धा अढळ आणि प्रयत्नांमध्ये चिकाटी असली पाहिजे. लक्ष्मीपुत्र असलेले दाते पुढेही सहाय्यता करत राहतील, असे स. स. काडसिद्धेश्वर स्वामी यांनी सांगितले.


