(राजापूर/ रत्नागिरी)
राजापूर शहरातील रस्त्यावर मासळी विक्री करताना मासळीची खवले आणि पाणी रस्त्यावर टाकून दुर्गंधी पसरवल्याच्या आरोपावरून सहा महिलांविरोधात राजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगरपरिषदेच्या स्वच्छता पथकाने केलेल्या कारवाईनंतर ही पोलिसी कारवाई करण्यात आली.
६ ऑक्टोबर रोजी सकाळी सुमारे ११.२० वाजता शिवाजी पथ ते बाजारपेठ जाणाऱ्या रस्त्यावर महालक्ष्मी हॉटेलसमोर ही कारवाई करण्यात आली. नगरपरिषदेचे स्वच्छता निरीक्षक अमित मोहन पोवार आणि सफाई कर्मचारी संदेश नाना जाधव हे रस्त्यावरील मासळी विक्रीबाबत कारवाई करण्यासाठी गेले असता, संबंधित महिला त्या ठिकाणी मासळी विक्री करताना आढळून आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. मासळी विक्रीदरम्यान खवले तसेच मासळीचे पाणी रस्त्यावर टाकल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता निर्माण होत असल्याच्या कारणावरून नगरपरिषदेच्या स्वच्छता पथकाने संबंधित प्रकाराची नोंद घेत पोलिसांत तक्रार दाखल केली.
या प्रकरणी नगरपरिषदेचे स्वच्छता मुकादम राजन रामचंद्र जाधव (५५, रा. धोपेश्वर, पन्हळे, राजापूर) यांनी फिर्याद दिली आहे. गुन्हा दाखल झालेल्या महिलांमध्ये सादिका फणसोपकर, शाहिन फणसोपकर, अक्सा समीर सोलकर, नाजिया वाडकर, अनिसा रशिद सोलकर आणि सुमय्या बोरकर (सर्व रा. नाटे, राजापूर परिसर) यांचा समावेश आहे. संबंधित महिलांविरोधात महाराष्ट्र नगरपालिका, नगरपंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम १९६५ मधील कलम २६७ व २६९ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम ११५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास राजापूर पोलिसांकडून सुरू आहे.


