(रत्नागिरी / वार्ताहर)
जिंदाल कंपनी प्रशासनाकडून स्थानिक रहिवासी, शेतकरी आणि मच्छिमारांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत स्थानिक नागरिकांनी शनिवारी (१५ ऑगस्ट) कंपनी प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली. विविध प्रलंबित मागण्यांकडे कंपनीचे लक्ष वेधण्यासाठी कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर एका दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
विकास कमलाकर निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली मुकद्दर नंदकुमार खाडे, दीपक चंद्रकांत परकर, निलेश रमाकांत घाटगे आणि समीर विष्णू मयेकर यांच्या पुढाकाराने हे आंदोलन करण्यात आले. सकाळी ८ वाजल्यापासून उपोषणकर्त्यांनी कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ शांततापूर्ण पद्धतीने ठिय्या मांडला. सायंकाळी ५ वाजेपर्यंत हे लाक्षणिक उपोषण सुरू ठेवण्यात आले.
स्थानिक जनता, शेतकरी आणि मच्छिमारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे कंपनी प्रशासनाचे लक्ष वेधणे, तसेच बाधितांना न्याय मिळवून देणे हा या आंदोलनाचा प्रमुख उद्देश असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
स्थानिक भूमिपुत्रांच्या या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी परिसरातील अनेक नागरिक व मान्यवरांनी उपोषणस्थळी भेट दिली. त्यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून त्यांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शविला.
प्रमोद प्रभाकर घाटगे, अनिरुद्ध कमलाकर साळवी, अक्षदा अविनाश देवरुखकर, अविनाश अरुण देवरुखकर, सचिन पांडुरंग भोपळे, योगेश कृष्णा निंबाळकर, साईराज किशोर धुंधुर, नारायण चंद्रकांत काताळकर, योगेश प्रभाकर घाटगे, सिद्धार्थ आत्माराम देवरुखकर, ओम प्रमोद घाटगे आणि नितीन पांडुरंग भोपळे यांच्यासह परिसरातील नागरिकांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला.
कंपनी प्रशासनाच्या कथित मनमानी कारभारामुळे स्थानिक शेतकरी आणि मच्छिमारांचे मोठे नुकसान होत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. स्थानिकांच्या समस्या आणि प्रलंबित मागण्यांवर कंपनी प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन न्याय दिला नाही, तर आगामी काळात यापेक्षाही तीव्र स्वरूपाचे जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा उपोषणकर्ते आणि ग्रामस्थांनी दिला.

