(रत्नागिरी)
रत्नागिरी जिल्ह्यातील कुपोषणाचे प्रमाण शून्यावर आणून राज्यात आदर्श निर्माण करण्याचा संकल्प जिल्हा परिषदेने केला असून, त्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येणार असल्याची घोषणा उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी केली. याचबरोबर जिल्हा परिषद शाळांच्या दुरुस्ती व नवीन वर्गखोल्यांसाठी २० कोटी रुपये, तर प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या अद्ययावतीकरणासाठी १० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची घोषणाही त्यांनी केली.
जिल्हा परिषदेत आयोजित कुपोषित बालकांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता केंद्रे, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, शिक्षण व अर्थ सभापती नंदकुमार मुरकर, महिला व बालविकास सभापती मयुरी शिर्के यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
रत्नागिरी राज्यात दुसऱ्या क्रमांकावर
सध्या कुपोषणाचे सर्वात कमी प्रमाण असलेल्या जिल्ह्यांमध्ये रत्नागिरीचा राज्यात दुसरा क्रमांक आहे. जिल्ह्यात सध्या तीव्र कमी वजनाची ३४, तर मध्यम कमी वजनाची ६३२ बालके आहेत. ही मध्यम श्रेणीतील बालके तीव्र कुपोषणाच्या गटात जाऊ नयेत, यासाठी आरोग्य विभागाला विशेष उपाययोजना करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.
कुपोषित बालकांसाठी विशेष योजना
कुपोषित बालकांना त्यांच्या पालकांसह आठ दिवस निवासी स्वरूपात ठेवून त्यांना सकस व पोषक आहार देण्याची व्यवस्था केली जाणार आहे. या उपक्रमासाठी डेरवण येथील वालावलकर रुग्णालयाचे सहकार्य घेतले जाणार आहे. तसेच जिल्हा वार्षिक योजनेतून आवश्यक औषधे आणि पूरक पोषण आहार उपलब्ध करून दिला जाणार आहे.
याशिवाय कुपोषित बालकांचे संगोपन आणि आरोग्य सुधारण्यासाठी संबंधित भागातील जिल्हा परिषद सदस्यांनी आपल्या प्रभागातील कुपोषित बालकांचे ‘पालकत्व’ स्वीकारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय बैठकीत घेण्यात आला.
प्राथमिक आरोग्य केंद्रांचे होणार अद्ययावतीकरण
ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध व्हावी, यासाठी दरवर्षी १० प्राथमिक आरोग्य केंद्रांचे अद्ययावतीकरण करण्यात येणार आहे. या कामासाठी १० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिली.
जि.प. शाळांचा कायापालट
जिल्ह्यातील शालेय शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी २०० ते २५० नवीन वर्गखोल्यांचे बांधकाम करण्यात येणार असून, त्यासाठी २० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात येणार आहे. विद्यार्थीसंख्येनुसार शाळांचा आराखडा तातडीने तयार करून ज्या शाळांच्या इमारतींची दुरुस्ती आवश्यक आहे, त्या कामांना प्राधान्याने सुरुवात करावी, असे निर्देश पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी शिक्षण विभागाला दिले.

