( रत्नागिरी /प्रतिनिधी )
मिऱ्या – नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील रत्नागिरी येथील महालक्ष्मी मंदिरापासून ते साळवी स्टॉपदरम्यानचा रस्ता ठिकठिकाणी खड्ड्यांनी भरून गेला असून, वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. रवी इन्फ्रा कंपनीने जे के फाईल रस्त्यावरील खड्डे भरण्यासाठी माती मिश्रीत मोठे दगड टाकण्याचे ‘ढिसाळ’ काम केले. मात्र त्यामुळे खड्डे भरले गेले नाहीत, उलट प्रवाशांची डोकेदुखी अधिकच वाढली होती.
या मार्गावर दररोज शेकडो वाहनांची ये-जा असते. सकाळ-संध्याकाळच्या वेळेत वाहतुकीचा ताण अधिक असल्याने वाहतूक कोंडीचा त्रास होत आहे. जे के फाईल येथे काही दिवसांपूर्वी तब्बल दोन ते तीन तास वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. सध्या काही भागात तुकड्यात काँक्रीटीकरण मार्गिका तयार करण्यात आल्याने त्या भागात डायव्हर्जन करण्यात आले आहेत. उर्वरित भागात रस्ता खोदून त्यावर योग्य भराव करण्यात आलेले नाही. परिणामी रस्त्यांवर मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत.
साइडपट्ट्यांचा अभाव आणि रस्त्यावरच्या खड्ड्यांमध्ये साचलेले पाणी यामुळे वाहनधारकांच्या वेगाने गाडी चालवल्याने पाणी थेट नागरिकांच्या अंगावर उडते. यामुळे पादचारी हैराण झाले असून, सायकलस्वार व शाळकरी मुलांना याचा अधिक त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यालगत साइडपट्ट्या नसल्याने सुरक्षित पायवाटच उरलेली नाही, आणि याकडे प्रशासन पूर्णतः दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे.
प्रशासनाचे आणि ठेकेदाराचे ‘डोळस दुर्लक्ष’
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभाग आणि संबंधित ठेकेदार यांचे काम फक्त औपचारिकतेपुरते मर्यादित असल्याचा आरोप होतो आहे. या भागातील रस्त्यांची अत्यंत बिकट अवस्था असतानाही ना ठेकेदाराला गांभीर्य आहे, ना प्राधिकरणाचे अधिकारी कुठे दिसत आहेत, प्रशासनासह ठेकेदार रवी इन्फ्रा कंपनीचे डोळस दुर्लक्ष होत आहे.
रात्रीचा प्रवास म्हणजे अपघाताला निमंत्रण
या रस्त्यांवर रात्रीच्या वेळेस प्रवास करणे म्हणजे थेट जीव धोक्यात घालण्यासारखे आहे. रात्रीच्या वेळी खड्ड्यांच्या खोलीचा अंदाज येत नाही अशा परिस्थितीत अपघात होण्याची शक्यता अधिक आहे. त्यातच मागून धावणाऱ्या मोठ्या वाहनांचा वेग आणि अचानक ब्रेक लागल्यास धोका टळणे कठीण होते. एकूणच, रत्नागिरी- नागपूर महामार्गावरील हा प्रमुख रस्ता सध्या बेवारस बनला आहे. नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला असतानाही संबंधित यंत्रणा मात्र अद्याप ‘गाफीलच’ आहे.

