(रत्नागिरी / वार्ताहर)
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे आणि रत्नागिरी क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेत जी. जी. पी. एस. प्रशालेच्या संघाने विजेतेपद पटकावले. गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या जवाहर क्रीडांगणावर झालेल्या अंतिम सामन्यात जी. जी. पी. एस. संघाने माध्यमिक आश्रमशाळा व कनिष्ठ महाविद्यालय, निवे बुद्रुक, देवरुखच्या संघाचा ३३ धावांनी पराभव केला. या विजयासह जी. जी. पी. एस. प्रशालेच्या संघाची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
अंतिम सामन्यात जी. जी. पी. एस. संघाने प्रथम फलंदाजी करताना सहा षटकांत ८० धावा केल्या. संघाच्या या धावसंख्येत रुद्र लांजेकरने ३९, तर आराध्य मोंडकरने ३७ धावांचे योगदान दिले. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या माध्यमिक आश्रमशाळा व कनिष्ठ महाविद्यालयाच्या संघाला जी. जी. पी. एस.च्या गोलंदाजांनी ४७ धावांवर रोखले.
देवांग गुरव, वेदांत चव्हाण, यश नाचणकर आणि आराध्य बांदिवडेकर यांच्या प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर जी. जी. पी. एस. संघाने प्रतिस्पर्धी संघावर नियंत्रण ठेवले. अखेर ३३ धावांनी विजय मिळवत संघाने जिल्हास्तरीय स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आणि विभागीय स्तरावरील स्पर्धेत प्रवेश निश्चित केला. स्पर्धेदरम्यान जी. जी. पी. एस.च्या सर्व खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.
या उल्लेखनीय यशाबद्दल रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे सर्व पदाधिकारी, जी. जी. पी. एस.च्या मुख्याध्यापिका सौ. सोनाली पाटणकर, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. अपूर्वा मुरकर, पूर्व प्राथमिक विभागप्रमुख सौ. शुभदा पटवर्धन आणि गुरुकुलप्रमुख वासुदेव परांजपे यांनी विजेत्या संघाचे अभिनंदन केले. तालुका क्रीडा अधिकारी गणेश खैरमोडे, अभ्यंकर-कुळकर्णी कॉलेजचे क्रीडा शिक्षक राकेश मालप आणि पटवर्धन कॉलेजचे क्रीडा शिक्षक श्रीपाद गुरव यांनीही संघाचे कौतुक केले.
विजेत्या संघाला मार्गदर्शन करणारे क्रीडा शिक्षक प्रमोद कदम यांचेही अभिनंदन करण्यात आले. विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या जी. जी. पी. एस.च्या क्रिकेट संघाकडून पुढील स्तरावरही चांगल्या कामगिरीची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.


