( रत्नागिरी / वार्ताहर )
मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमान भागोजीशेठ कीर विधी महाविद्यालयाने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. महाविद्यालयाची विद्यार्थिनी राधा टिकेकर हिने हिंदी एकपात्री अभिनय स्पर्धेत प्रभावी सादरीकरण करत सुवर्णपदक पटकावले.
विद्यापीठ विभागातील मातब्बर कलाकारांच्या सहभागामुळे चुरशीच्या ठरलेल्या या अंतिम फेरीत राधा टिकेकर हिने आपल्या अभिनय कौशल्याची प्रभावी छाप उमटवली. अचूक संवादफेक आणि परिणामकारक सादरीकरणाच्या जोरावर तिने परीक्षकांची मने जिंकत विजेतेपदावर आपले नाव कोरले. तिच्या या यशामुळे कीर विधी महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एका सुवर्णपदकाची भर पडली आहे.
या स्पर्धेच्या तयारीसाठी राधा टिकेकर हिला संचालक दीपक माणगावकर आणि ओंकार पाटकर यांचे मोलाचे तसेच तांत्रिक मार्गदर्शन लाभले. महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. संयोगिता सासने आणि प्राचार्य डॉ. आशिष बर्वे यांनीही तिला प्रोत्साहन दिले.
राधा टिकेकर हिच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्ष शिल्पा पटवर्धन, सचिव सतीश शेवडे यांच्यासह सर्व पदाधिकारी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकांनी तिचे अभिनंदन केले.


