(रत्नागिरी/ वार्ताहर)
शहरातील के. सी. जैन नगर, मारुती मंदिर परिसरातील प्रसिद्ध ‘श्री महालक्ष्मी मिनी मॉल’ला भाऊबीजेच्या पहाटे लागलेल्या भीषण आगीत मॉलमधील विविध आस्थापनांचे मोठे नुकसान झाले. या दुर्घटनेची उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी आज घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. नुकसानग्रस्त व्यावसायिकांशी संवाद साधत त्यांना धीर देतानाच विम्याची भरपाई लवकर मिळावी, यासाठी संबंधित विमा कंपन्यांनी आजच नुकसानीचे सर्वेक्षण पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.
आगीची माहिती मिळाल्यापासून ती पूर्णपणे आटोक्यात येईपर्यंत आपण व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून संबंधित यंत्रणांच्या सतत संपर्कात होतो, असे डॉ. सामंत यांनी सांगितले. अग्निशमन दलाच्या जवानांनी चार ते पाच तास अथक प्रयत्न करत १० ते १५ बंबांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवले. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सणासुदीच्या काळात वर्षानुवर्षे मेहनत करून उभा केलेला व्यवसाय आगीमुळे उद्ध्वस्त होणे ही अत्यंत वेदनादायी घटना आहे. या संकटातून नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांना पुन्हा उभे करण्यासाठी सहकार्य करणे ही आपलीही जबाबदारी असल्याचे पालकमंत्र्यांनी नमूद केले. विमा कंपन्यांना तातडीने पंचनामे आणि नुकसानीचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, आगीची झळ बसलेल्या मॉललगतच्या आणखी एका दुकानाचेही स्वतंत्र सर्वेक्षण करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.
दरम्यान, आवश्यक दुरुस्ती आणि उपाययोजनांची कामे वेगाने पूर्ण करून येत्या तीन ते चार दिवसांत ‘श्री महालक्ष्मी मिनी मॉल’ पुन्हा नागरिकांच्या सेवेत सुरू करण्याचा मानस डॉ. सामंत यांनी व्यक्त केला. भविष्यात अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी अग्निसुरक्षेच्या नियमांचे पालन आणि आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना काटेकोरपणे राबविण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या.
“आगीमुळे दुकानांचे आर्थिक नुकसान झाले असले, तरी व्यापाऱ्यांची जिद्द आणि पुन्हा उभे राहण्याचा आत्मविश्वास कमी होता कामा नये. या कठीण प्रसंगी शासन आणि मी स्वतः व्यावसायिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. त्यांचा व्यवसाय पुन्हा पूर्ववत सुरू होण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल आणि आवश्यक पाठपुरावा करण्यात येईल,” असा विश्वास पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी यावेळी व्यक्त केला.


