( रत्नागिरी /प्रतिनिधी )
तालुक्यातील मिऱ्या – नागपूर महामार्गाचे काम संत गतीने सुरू आहे. खेडशी येथील महालक्ष्मी मंदिर जवळील सर्विस रोडची अवस्था अक्षरशः बिकट झाली आहे. बारीक खडी रस्त्यावर साचून राहिल्याने वाहनचालकांना दिवस-रात्र धोक्याचा प्रवास करावा लागत असून, अपघातांच्या घटनांची शक्यता सतत डोकावत आहे.
या भागातील सर्विस रोडवर प्रचंड खड्डे निर्माण झाल्याने काही दिवसांपूर्वी छोट्या पट्ट्यात डांबरीकरणाचा थर टाकून डागडुजी करण्यात आली होती. मात्र ही कामे दर्जाहीन असल्याचे चट्कन उघड झाले. अवघ्या काही दिवसांत डांबर उखडले आणि रस्त्यावर खडी साचून अपघाताचे नवे संकट निर्माण झाले. कामकाज हाती घेतलेल्या ठेकेदार रवी इन्फ्रा कंपनीने रस्त्यावर साचून राहिलेली खडी बाजूला करण्याचे कष्ट न घेताच ती तशीच सोडल्याने दुर्दशा अधिकच वाढली आहे. पावसाळ्यात गटारे निर्माण न केल्याने पाणी थेट रस्त्यावरून वाहत असून, रस्ता चिखलमय होऊन काही वेळेस वाहतूक कोंडी देखील होते. वाहनचालकांची ‘खडीवरील कसरत’ आणि त्यातून होणारा त्रास हा रोजचा अनुभव बनला आहे.

निकृष्ट नियोजन आणि जबाबदार यंत्रणांच्या दुर्लक्षामुळे वाहनचालकांसह नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी मात्र डोळ्यावर पट्टी बांधल्याप्रमाणे शांत बसल्याचे चित्र दिसून येत आहे. रस्त्याच्या दर्जावर देखरेख ठेवणारे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी मूकदर्शक बनल्याने ठेकेदाराचा मनमानी कारभार अधिकच फोफावला आहे. ठेकेदार कंपनीच्या मनमानी कारभारावर संतप्त प्रतिक्रिया उमटत असतात. वाहनचालकांच्या जीवाशी खेळणाऱ्या ठेकेदार कंपनीला अंकुश कोण बसवणार?असा सवाल ही उपस्थित केला जात आहे.

