(जाकादेवी / संतोष पवार)
शिक्षण हा सर्व क्षेत्रांचा पाया आहे. जिद्दीने आणि आत्मविश्वासाने शिक्षण घेतल्यास कोणतेही उद्दिष्ट साध्य करता येते. विद्यार्थ्यांनी व्यसनांपासून दूर राहून शिक्षण, मेहनत आणि कौशल्य विकासावर लक्ष केंद्रित करावे. ध्येय निश्चित करून प्रचंड मेहनत घेतल्यास जीवनात निश्चितच यश मिळवता येते, असा संदेश रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अभय तेली यांनी विद्यार्थ्यांना दिला.
जाकादेवी येथील तात्यासाहेब मुळ्ये माध्यमिक विद्यालय व बाबाराम परशराम कदम कनिष्ठ महाविद्यालयात ‘मिशन रायझिंग फ्लॉवर’ या उपक्रमांतर्गत आयोजित विद्यार्थी मार्गदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते. विद्यार्थ्यांनी विद्यार्थी दशेतच आपल्या क्षमता आणि कौशल्यांना योग्य दिशा देऊन ध्येयाने प्रेरित होण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
उपनिरीक्षक तेली म्हणाले की, विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले तसेच संत-महात्मे आणि थोर क्रांतिकारकांचे कृतीशील विचार आत्मसात करून जीवनात हिंमतीने पुढे जावे. आपल्यासाठी कष्ट करणाऱ्या आई-वडिलांचा आणि गुरुजनांचा सदैव आदर ठेवावा. व्यसनांपासून दूर राहून शिक्षण आणि चांगल्या संस्कारांच्या माध्यमातून आपले व्यक्तिमत्त्व घडवावे, असे आवाहन त्यांनी केले.
आपल्या जीवनप्रवासातील अनुभव सांगताना अभय तेली यांनी सांगितले की, “मी अनाथ आश्रमात वाढलो. शिक्षणाच्या जोरावर अधिकारी पदापर्यंत पोहोचलो. आज शासनाने माझ्यावर देशसेवेची जबाबदारी सोपवली आहे. मिळालेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत आहे. हे सर्व शिक्षण आणि मेहनतीच्या बळावर शक्य झाले.” त्यांच्या या वास्तववादी आणि प्रेरणादायी अनुभवकथनाने उपस्थित विद्यार्थी व शिक्षक भारावून गेले.
यावेळी ॲड. सत्ते यांनी अपंगत्वावर मात करून धावण्याच्या स्पर्धेत देशासाठी सुवर्णपदक मिळविणाऱ्या खेळाडूचे उदाहरण देत जिद्द आणि इच्छाशक्तीच्या जोरावर कोणतीही अडचण पार करता येते, हे स्पष्ट केले. तसेच विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांकडे गांभीर्याने पाहून त्यासाठी आतापासूनच नियोजनबद्ध तयारी करावी, असे मार्गदर्शन केले.
‘मिशन रायझिंग फ्लॉवर’चा उद्देश
विद्यार्थ्यांनी गुन्हेगारी प्रवृत्ती आणि व्यसनांपासून दूर राहावे, शिक्षणावर लक्ष केंद्रित करून आपले भविष्य उज्ज्वल व निरोगी घडवावे, या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अभय तेली, बीट अंमलदार महेश टेमकर आणि राकेश सत्वे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या निमित्ताने शाळा व शिक्षण संस्थेच्या वतीने मुख्याध्यापक नितीन मोरे यांच्या हस्ते पोलीस उपनिरीक्षक अभय तेली यांचा सत्कार करण्यात आला. तसेच उपनिरीक्षक अभय तेली व बीट अंमलदार महेश टेमकर यांच्या हस्ते शाळेतील धाडसी विद्यार्थी सर्वेश मायंगडे याचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाला खालगाव बीट अंमलदार महेश टेमकर, पोलीस पाटील रमेश कांबळे, मुख्याध्यापक नितीन मोरे, पर्यवेक्षक शाम महाकाळ, ज्येष्ठ शिक्षक अरुण कांबळे, सांस्कृतिक विभाग प्रमुख संतोष पवार, क्रीडा शिक्षक संतोष सनगरे, किशोर नलवडे, वैभव खानोलकर, अमित बोले, मंदार रसाळ, अवधूत जाधव, संदेश सोनवडकर, क्रीडाशिक्षिका मनिषा धोंगडे, अस्मिता आयरे, स्नेहल माने, श्रीम. दळवी यांच्यासह इयत्ता पाचवी ते बारावीतील एक हजारांहून अधिक विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक नितीन मोरे यांनी केले. सूत्रसंचालन वैभव खानोलकर यांनी केले, तर आभार अरुण कांबळे यांनी मानले.
फोटो : जाकादेवी विद्यालयातर्फे पोलीस उपनिरीक्षक अभय तेली यांचा सत्कार करताना मुख्याध्यापक नितीन मोरे. सोबत पर्यवेक्षक व शिक्षकवर्ग.

