(महाड / रायगड)
दिवा-रत्नागिरी पॅसेंजर रेल्वेने प्रवास करणाऱ्या २८ वर्षीय तरुणाचा धावत्या रेल्वेतून खाली पडून मृत्यू झाल्याची घटना महाड तालुक्यातील कावळे गावाच्या हद्दीत घडली. दीपक रहाटे असे मृत तरुणाचे नाव असून, ते मूळचे संगमेश्वर येथील रहिवासी होते. या घटनेमुळे संगमेश्वर परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दीपक रहाटे दिवा-रत्नागिरी पॅसेंजरमधून प्रवास करत होते. रेल्वे कावळे गावाजवळून जात असताना त्याचवेळी जवळून दुसरी रेल्वे जात होती. या दरम्यान अचानक तोल गेल्याने दीपक रहाटे धावत्या रेल्वेतून खाली पडले. या दुर्घटनेत त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
अपघाताची माहिती मिळताच महाड तालुका पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. त्यानंतर महाशक्ती ॲम्बुलन्सचे अनिल चव्हाण यांच्या मदतीने जखमी अवस्थेतील दीपक रहाटे यांना तातडीने महाड ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
रुग्णालयात शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. दीपक रहाटे यांच्या अपघाती निधनाच्या वृत्ताने संगमेश्वर परिसरात हळहळ व्यक्त होत असून सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे.


