(संगमेश्वर / एजाज पटेल)
कुरधुंडा ग्रामपंचायत क्षेत्रात सध्या प्रशासक राज सुरू असून, ग्रामस्थांकडून घरपट्टी आणि इतर प्रशासकीय कर नियमितपणे वसूल केले जात असतानाही मूलभूत नागरी सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप प्रतिष्ठित ग्रामस्थ कैस मालगुंडकर यांनी केला आहे. गावातील रस्त्यांच्या दुतर्फा वाढलेली रानटी झाडी, साचलेला कचरा आणि अस्वच्छतेमुळे नागरिकांच्या आरोग्याबरोबरच सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला असून, कराच्या माध्यमातून महसूल गोळा केला जातो; मात्र त्याच प्रमाणात सुविधा दिल्या जात नाहीत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
विशेष म्हणजे, संपूर्ण गावाच्या स्वच्छतेची जबाबदारी असलेल्या ग्रामपंचायत कार्यालयासमोरील रस्त्याचीच दुरवस्था झाल्याचे मालगुंडकर यांनी निदर्शनास आणून दिले आहे. कार्यालयाच्या परिसरात अस्वच्छता आणि रानटी झाडी वाढलेली असताना दिवसभर कार्यालयात उपस्थित असलेल्या प्रशासक व संबंधित अधिकाऱ्यांचे याकडे लक्ष कसे जात नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ग्रामपंचायत कार्यालयासमोरील परिसराचीच अशी अवस्था असेल, तर संपूर्ण गावातील स्वच्छतेची व्यवस्था कशी राखली जात असेल, असा सवालही ग्रामस्थांकडून केला जात आहे.
गावातून शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा मार्ग महत्त्वाचा असून, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाढलेल्या झाडीमुळे विद्यार्थ्यांना दररोज धोकादायक परिस्थितीतून ये-जा करावी लागत असल्याचे सांगण्यात येत आहे. विशेषतः वळणांवर वाढलेल्या झाडीमुळे समोरून येणारी वाहने दिसत नसल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत पालकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.
गावातील मुख्य रस्त्यांच्या कडेला मोठ्या प्रमाणात गवत, रानटी झाडे-झुडपे आणि कचरा साचल्याने अस्वच्छतेचे चित्र निर्माण झाले आहे. या परिस्थितीमुळे डास, माश्या आणि विविध कीटकांचा उपद्रव वाढण्याची शक्यता असून रोगराईची भीती निर्माण झाल्याचे मालगुंडकर यांनी म्हटले आहे. ग्रामस्थांकडून घरपट्टी आणि इतर कर वसूल केले जात असताना स्वच्छतेसारख्या मूलभूत सुविधांसाठी त्या निधीचा वापर का केला जात नाही, असा सवाल त्यांनी केला आहे.
रस्त्याच्या दुतर्फा वाढलेल्या झाडीमुळे अपघाताचा धोका तर आहेच; शिवाय या झाडीमध्ये विंचू, साप आणि इतर सरपटणाऱ्या प्राण्यांचा वावर वाढल्याचेही ग्रामस्थांचे म्हणणे आहे. पादचारी, महिला आणि लहान मुलांना याचा धोका निर्माण झाला असून, रात्रीच्या वेळी या मार्गावरून ये-जा करणे अधिक धोकादायक ठरत असल्याचे सांगण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर कुरधुंडा गावातील रस्त्यांच्या कडेला वाढलेली झाडे-झुडपे तातडीने हटवावीत, कीटकनाशकांची फवारणी करावी आणि संपूर्ण गावात स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी कैस मालगुंडकर आणि स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे. प्रशासनाने या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन ठोस कारवाई करावी, अन्यथा ग्रामस्थ प्रशासकीय स्तरावर तीव्र पाठपुरावा करून जबाबदार अधिकाऱ्यांना जाब विचारतील, असा इशाराही मालगुंडकर यांनी दिला आहे.
“ग्रामस्थ घरपट्टी आणि इतर कर भरतात, मग ग्रामपंचायत आम्हाला मूलभूत सुविधा आणि आरोग्यदायी वातावरण का देत नाही? खुद्द ग्रामपंचायत कार्यालयासमोरील रस्त्याचीच ही दुरवस्था आहे, तर शाळेत जाणाऱ्या चिमुकल्या विद्यार्थ्यांचा जीवही या झाडी-झुडपांमुळे धोक्यात आला आहे. विंचू आणि सरपटणाऱ्या प्राण्यांचा वावर वाढला असून प्रशासनाने तात्काळ स्वच्छता मोहीम न राबवल्यास सर्व ग्रामस्थ प्रशासकीय स्तरावर तीव्र पाठपुरावा करून जबाबदार अधिकाऱ्यांना जाब विचारतील,” असे कैस मालगुंडकर यांनी सांगितले.


