(रत्नागिरी /प्रतिनिधी)
गोळप-शिंरबाडवाडी येथे विषारी औषध घेतल्याचा संशय असलेल्या ५२ वर्षीय व्यक्तीचा रत्नागिरीतील शासकीय रुग्णालयात उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. दिपक भिकाजी घाणेकर (वय ५२, रा. गोळप, शिंरबाडवाडी, ता. जि. रत्नागिरी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पूर्णगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांच्या नोंदीनुसार, २८ सप्टेंबर रोजी दिपक घाणेकर हे दारू पिऊन घरी आले होते. त्यानंतर ते घरातील अडगळीच्या सामानाच्या खोलीत असलेल्या खाटेवर जाऊन झोपले. दुपारी सुमारे १२.४५ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या सुनेने त्यांना जेवणासाठी उठविण्यासाठी खोलीत जाऊन पाहिले असता त्यांनी उलटी केल्याचे निदर्शनास आले. यानंतर त्यांनी कुटुंबीयांना बोलावले. घाणेकर हे खाटेवर झोपलेले असताना त्यांच्या मुलाला संशय आल्याने अडगळीच्या खोलीत ठेवलेली कीटकनाशकाची बाटली तपासण्यात आली. त्या बाटलीत काही प्रमाणात औषध शिल्लक असल्याचे आढळल्याचे खबर देणाऱ्याने पोलिसांना सांगितले.
प्रकृती गंभीर असल्याचे लक्षात आल्यानंतर दिपक घाणेकर यांना रिक्षाने उपचारासाठी रत्नागिरी येथील सिव्हील हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर उपचार सुरू करण्यापूर्वीच त्यांना मृत घोषित केले. या घटनेची माहिती प्रथमेश दिपक घाणेकर यांनी पोलिसांना दिली. याप्रकरणी बीएनएसएस कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पूर्णगड पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.


