(रत्नागिरी / वार्ताहर)
शासकीय कार्यालयांमध्ये कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना प्रतीक्षेच्या वेळेत वाचनाची संधी मिळावी आणि शासकीय कार्यक्रमांमध्ये प्लास्टिकचा वापर कमी व्हावा, या मागणीसाठी चक्रभेदी सोशल फाउंडेशन, देवरुखच्या अध्यक्षा समाजसेविका वैदेही सुधीर सावंत यांनी केलेल्या पाठपुराव्याला प्रशासनाने प्रतिसाद दिला आहे. रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाने जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयांच्या स्वागत कक्षात वर्तमानपत्रे, विकासविषयक मासिके आणि पुस्तके उपलब्ध करून ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच कार्यक्रमांमध्ये प्लास्टिकविरहित पुष्पगुच्छांचा वापर करावा आणि पाण्याच्या प्लास्टिक बाटल्या टाळाव्यात, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.
वैदेही सावंत यांनी ७ जुलै २०२६ रोजी यासंदर्भात जिल्हा प्रशासनाकडे निवेदन सादर केले होते. या मागणीची दखल घेत जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी यांनी या संदर्भात विविध शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांना पत्र पाठवून आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयाने दिलेल्या निर्देशानुसार, शासकीय कार्यालयांच्या स्वागत कक्षात नागरिकांसाठी वर्तमानपत्रे, विकास संदर्भातील मासिके तसेच पुस्तके उपलब्ध करून ठेवण्यात यावीत. कार्यालयीन कामकाजासाठी नागरिकांना प्रतीक्षा करावी लागल्यास या साहित्याच्या माध्यमातून त्यांना वाचनाची संधी मिळावी, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
याच पत्रातून शासकीय कार्यक्रमांमध्ये प्लास्टिकविरहित पुष्पगुच्छांचा वापर करण्याबरोबरच पाण्याच्या प्लास्टिक बाटल्यांचा वापर टाळण्यासाठी आवश्यक आदेश व कार्यवाही करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांसाठी वाचनाची सुविधा आणि प्लास्टिकमुक्त कार्यालयीन व कार्यक्रम संस्कृती, या दोन्ही बाबींना प्रशासनाच्या निर्देशांमुळे चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पत्राची प्रत सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण, कोकण पाटबंधारे मंडळ, आरोग्य विभाग, समाजकल्याण, जिल्हा परिषद, वन विभाग, शिक्षण विभाग, परिवहन, महसूल, नगररचना, उद्योग, पर्यटन आदी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना पाठविण्यात आली आहे. कागदपत्रानुसार एकूण ७६ संबंधित कार्यालये आणि अधिकाऱ्यांकडे हे पत्र पाठविण्यात आले आहे.
दरम्यान, शासकीय कार्यालयांमध्ये नागरिकांसाठी वाचन साहित्य उपलब्ध करून देण्यासह शासकीय कार्यक्रमांमध्ये प्लास्टिकचा वापर कमी करण्याची मागणी चक्रभेदी सोशल फाउंडेशनने केली होती. या मागणीची प्रशासनाने दखल घेत जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांसाठी निर्देश जारी केल्याबद्दल वैदेही सावंत यांनी समाधान व्यक्त केले आहे.
मात्र, केवळ आदेश काढून न थांबता त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी किती कार्यालयांमध्ये होते, स्वागत कक्षांमध्ये वर्तमानपत्रे, मासिके व पुस्तके नियमितपणे उपलब्ध राहतात का आणि प्लास्टिकविरोधी निर्देशांचे पालन होते का, हे आता महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या या निर्देशांची संबंधित विभागांकडून प्रत्यक्ष अंमलबजावणी कितपत होते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
याच आशयाचे पत्र मुख्यमंत्री यांनाही पूर्वी पाठविण्यात आले असून, त्यांच्या उत्तराच्या प्रतीक्षेत असल्याचे वैदेही सावंत यांनी सांगितले.


