(रत्नागिरी/ प्रतिनिधी)
सार्वजनिक ठिकाणी विदेशी मद्यप्राशन करण्याच्या उद्देशाने मद्याची बाटली जवळ बाळगल्याप्रकरणी तसेच विनापरवाना गावठी हातभट्टीची दारू विक्रीसाठी ताब्यात ठेवल्याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण आणि देवरुख पोलिसांनी दोन स्वतंत्र कारवाया केल्या आहे. ६ ऑक्टोबर रोजी घडलेल्या या घटनांमध्ये दोघांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील बांबर फाट्याच्या रस्त्यालगत सार्वजनिक ठिकाणी विदेशी मद्यप्राशन करण्याच्या उद्देशाने बसल्याचा आरोप करत अमोल दत्ताराम ताम्हणकर (वय ४०, रा. कशेळी, ताम्हणकरवाडी, ता. जि. रत्नागिरी) याच्याविरुद्ध रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांच्या नोंदीनुसार, ताम्हणकर याच्याकडे रॉयल चॅलेंजर कंपनीची विदेशी मद्याची बाटली होती. मद्य पिण्याचा किंवा जवळ बाळगण्याचा परवाना नसताना सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करण्याच्या उद्देशाने तो आढळून आल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. ही घटना ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सुमारे ७.२५ वाजता बांबर फाट्याजवळ घडली. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सूर्याजी राजेंद्र पाटील यांनी फिर्याद दिली असून, महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या घटनेत देवरुख पोलिस ठाण्याच्या साखरपा पोलीस दूरक्षेत्राच्या हद्दीत श्रीकांत चंद्रकांत चव्हाण (वय ४५, रा. कोंडगाव, चव्हाणवाडी, ता. संगमेश्वर) याच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली. घराजवळील शेतजमिनीलगत विनापरवाना गावठी हातभट्टीची दारू विक्रीसाठी बाळगल्याचा आरोप त्याच्यावर आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चव्हाण याच्याकडे पाच लिटर क्षमतेच्या प्लास्टिक कॅनमध्ये पाच लिटर गावठी हातभट्टीची दारू आढळली. त्यासोबत दारूचा वास असलेला जुना काचेचा ग्लासही जप्त करण्यात आला. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत ५६० रुपये असल्याचे पोलिस नोंदीत नमूद आहे.
ही कारवाई ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सुमारे ६.१५ वाजता करण्यात आली. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सुजीत सुधीर पाटील यांनी फिर्याद दिली असून, महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही प्रकरणांचा पुढील तपास संबंधित पोलिस ठाण्यांकडून सुरू आहे.


