(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा वाटद कवठेवाडी या शाळेच्या ६७ व्या वर्धापन दिनानिमित्त विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थ यांच्यासाठी रत्नागिरी जिल्हा पतंजली योग समितीच्या माध्यमातून मोफत योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात शालेय विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थ यांनी सहभाग घेतला.
हे शिबीर अत्यंत नियोजनपूर्वक पतंजली योग समितीच्या महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्या रमाताई जोग यांच्या मार्गदर्शनाखाली रोज सकाळी पाच ते सात या वेळेत संपन्न झाले. या शिबिरात पतंजली योग समितीच्या नियमावलीनुसार रमाताई जोग यांनी दररोज योगिक जॉगिंग, प्राणायाम, योगासने यासह आरोग्यविषयक माहिती देतांना विद्यार्थ्यांसह पालक, महिला आणि ग्रामस्थ यांना मार्गदर्शन केले. त्यासोबतच योग शिक्षण सतत सुरू राहावे यासाठी त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांमधून उप योग शिक्षकांची निवड करून त्यांना प्रात्यक्षिकासह सराव घेत सूचना दिल्या. या शिबिराला वाटद कवठेवाडी शाळेसह परिसरसतील शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते. महत्वाचे म्हणजे शाळा परिसरात पालखी उत्सव असतानाही विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थ यांची उपस्थिती लक्षणीय होती.
या समारोप प्रसंगी रमाताई जोग यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा करत असलेल्या प्रयत्नांचे कौतुक करताना विद्यार्थ्यांनी अशा उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन करून, उप योग शिक्षकांनी आपल्या कुटूंबातील सदस्यांसह सर्वांसाठी योग शिक्षणाचा प्रसार करावा, यासाठी त्यांच्या पालकांनी सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच याप्रसंगी उपस्थित असणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या चित्रलेखा गांधी यांनीही विद्यार्थ्यांकडील चिकाटीचे कौतुक करत एवढ्या पहाटे आणि मोठया प्रमाणात उपस्थित राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्यातील चिकाटी कायम ठेवत स्वतःला घडवावे असे आवाहन केले. तर यावेळी विश्वनाथ शिर्के यांनीही आपल्या मनोगतात पतंजली योग समितीला धन्यवाद देऊन शाळेने भविष्यातही असे उपक्रम राबवत विद्यार्थी घडवावेत सांगितले. तसेच विनोद वरवटकर यांनीही मनोगत व्यक्त करताना असे उपक्रम शाळांमध्ये राबविण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले.
या शिबीराचे नियोजन पंचायत समिती रत्नागिरीच्या गटशिक्षणाधिकारी प्रेरणा शिंदे, गणपतीपुळे प्रभागाच्या शिक्षण विस्तार अधिकारी सविता तोटावार यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापक माधव अंकलगे आणि सहशिक्षिका राधा नारायणकर यांनी केले होते.
या शिबिराच्या यशस्वीतेसाठी शाळा विकास समितीचे अध्यक्ष अप्पा धनावडे, शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा स्वाती धनावडे, उदय रहाटे, नितीन झगडे यांच्यासह शाळा विकास समिती, शालेय व्यवस्थापन समिती, वाटद कवठेवाडी, वाटद तांबटकरवाडी, वाटद धोपटवाडी मधील सर्व विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थ यांनी प्रयत्न केले.