(रत्नागिरी / प्रतिनिधी)
मुंबई-गोवा महामार्गालगत निवळी येथील रांबोळकरीन देवस्थानासमोर असलेल्या एका विहिरीत उडी मारून चाळीस वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. महेंद्र गोविंद सनगरे (वय ४०, रा. हातखंबा सनगरेवाडी) असे मृत व्यक्तीचे नाव असून ते पेट्रोल पंपावर कामाला होते.
१२ जानेवारी रोजी महेंद्र सनगरे हे नेहमीप्रमाणे कामावर गेले होते. मात्र रात्री ड्युटी संपल्यानंतर ते घरी परतले नाहीत. त्यामुळे कुटुंबीयांनी दुसऱ्या दिवसापासून त्यांचा शोध सुरू केला. अखेर बेपत्ता असल्याची नोंद पोलिस ठाण्यात करण्यात आली. दरम्यान, शोधमोहीम सुरू असतानाच आज (१४ जानेवारी) रोजी सकाळी सुमारे अकरा वाजण्याच्या सुमारास निवळी येथील रांबोळकरीन देवस्थानासमोर असलेल्या एका विहिरीत त्यांचा मृतदेह आढळून आला. आत्महत्येपूर्वी महेंद्र सनगरे यांनी त्यांच्या बॅगेवर ‘गरिबीला कंटाळून आत्महत्या करत आहे’ असा मजकूर लिहिल्याचे निदर्शनास आले.
घटनास्थळी त्यांची बॅग, चप्पल व मोबाईल फोनही सापडले. या घटनेची माहिती मिळताच हातखंबा तारवेवाडीचे पोलिस पाटील तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर ग्रामीण पोलिसांना माहिती देण्यात आली. ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र यादव यांच्यासह बीट अंमलदार भिसे, टेमकर आदींनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. पुढील तपास ग्रामीण पोलिस करत आहेत.
या घटनेमुळे हातखंबा परिसरात हळहळ व्यक्त होत असून आर्थिक विवंचनेतून घडलेल्या या आत्महत्येने पुन्हा एकदा समाजासमोर गंभीर प्रश्न उभे केले आहेत.आर्थिक अडचणी, गरिबी, कर्जबाजारीपणा किंवा वैयक्तिक समस्या या तात्पुरत्या असतात; मात्र आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय कायमस्वरूपी वेदना मागे सोडतो. आत्महत्या ही कोणत्याही समस्येवरचा उपाय नसून, ती कुटुंबीयांसह समाजालाही खोल जखम देणारी घटना ठरते. अडचणीच्या काळात एकटे पडल्याची भावना निर्माण होऊ शकते, मात्र शासनाच्या विविध योजना, सामाजिक संस्था, नातेवाईक व मित्रपरिवार यांच्याकडून मदत उपलब्ध असते. संकटाच्या वेळी संवाद साधणे, मदत मागणे आणि समस्या मांडणे अत्यंत गरजेचे आहे. वेळेवर आधार मिळाल्यास अनेक आयुष्ये वाचू शकतात.

