(गुहागर)
दाभोळहून चिपळूण येथे लग्नासाठी निघालेल्या क्रुझर वाहनाचा २ जून रोजी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास गुहागर-चिपळूण मार्गावर देवघर-मार्गताम्हाणे परिसरात भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत वाहनातील ७ ते ८ प्रवासी जखमी झाले असून, यामधील दोन ते तीन जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
अपघाताची प्राथमिक माहिती अशी की, चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यानंतर क्रुझर रस्त्याच्या खाली घसरली आणि झाडावर जाऊन आदळली. अपघातग्रस्त क्रुझर बुरोंडी (ता. दापोली) येथील असल्याचे निष्पन्न झाले आहे. या वाहनात एकूण १५ प्रवासी होते आणि सर्व प्रवासी दाभोळ येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. अपघातानंतर तातडीने डेरवण येथील रुग्णालयात जखमींना उपचारासाठी दाखल करण्यात आले. किरकोळ जखमींवर प्राथमिक उपचार करून घरी सोडण्यात आले असून, उर्वरित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी सावर्डे पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. अपघातात क्रुझरचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.