( गुहागर / वार्ताहर )
शहरातील ब्राह्मणवाडी येथे संतोष व सचिन मधुकर बामणे यांच्या दुमजली घराला मंगळवारी मध्यरात्री १ वाजून ४५ मिनिटांनी आग लागून २० लाखांहून अधिक नुकसान झाले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर किराणा दुकानासाठी मोठ्या प्रमाणात साठवून ठेवलेला मालही आगीत जळून खाक झाला.
सचिन बामणे हे किराणा व्यापारी असून त्यांचे भाऊ संतोष बामणे यांचेही घराबाहेर जनरल स्टोअरचे दुकान आहे. घराच्या खालच्या भागात सचिन बामणे यांची आई, पत्नी आणि दोन मुले राहतात. वरच्या मजल्यावर किराणा दुकानाचा माल साठवून ठेवण्यात आला होता. गणेशोत्सव असल्याने काही दिवसांपूर्वीच मोठ्या प्रमाणात दुकानाचे सामान तेथे ठेवण्यात आले होते. दुसऱ्या मजल्यावर संतोष बामणे, त्यांची पत्नी आणि दोन मुले राहत होती.
मध्यरात्री घराला आग लागल्याचे लक्षात येताच संतोष व सचिन बामणे यांनी तत्काळ घराबाहेर पडत सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला. काही मिनिटांतच शेजारी, मित्रमंडळी आणि गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत आग विझविण्याचे प्रयत्न सुरू केले. मात्र, घराच्या वरील भागात कौलारू बांधकामासह मोठ्या प्रमाणात लाकडी सामान व प्लायवूडचा वापर असल्याने आग आटोक्यात आणणे कठीण झाले.
आग विझविताना शक्य तेवढे सामान घराबाहेर काढण्यात आले. मात्र, घरातील बहुतांशी वस्तू आगीच्या भक्ष्यस्थानी पडून जळून खाक झाल्या. या आगीत २० लाखांहून अधिक नुकसान झाल्याचे सांगण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली. मुख्याधिकारी स्वप्निल चव्हाण यांनीही प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली. आगीचे कारण स्पष्ट झाले असले तरी शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी, अशी चर्चा सुरू होती.


