OpenAI येत्या काही आठवड्यांत ChatGPT वर जाहिरातींची चाचणी सुरू करणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चॅटबॉट चालवण्यासाठी लागणारा वाढता खर्च भागवण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. कंपनीने आपल्या अधिकृत ब्लॉग पोस्टमध्ये स्पष्ट केलं आहे की, सुरुवातीला या जाहिराती युनायटेड स्टेट्समधील मोफत आणि कमी-स्तरीय सबस्क्रिप्शन असलेल्या वापरकर्त्यांना दिसतील. मात्र प्रीमियम प्रो आणि एंटरप्राइझ सबस्क्राइबर्सना जाहिरातमुक्त अनुभव मिळत राहील.
जनरेटिव्ह एआय चॅटबॉट्समध्ये जाहिराती समाविष्ट करणे हा संवेदनशील विषय मानला जातो. कारण जाहिरातींमुळे वापरकर्त्याच्या अनुभवावर परिणाम होऊ शकतो. मात्र एआय सेवा चालवण्यासाठी लागणाऱ्या प्रचंड संगणकीय खर्चामुळे OpenAI ला नव्या महसुली स्रोतांचा शोध घ्यावा लागत असल्याचं चित्र आहे. ChatGPT चे जवळपास एक अब्ज वापरकर्ते असले तरी त्यापैकी फारच कमी जण सशुल्क सेवा घेतात, त्यामुळे कंपनीवर उत्पन्न वाढवण्याचा दबाव वाढला आहे.
ChatGPT 2022 मध्ये लाँच झाल्यानंतर OpenAI चं मूल्यांकन फंडिंग फेऱ्यांमधून सुमारे 500 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचल्याचं सांगितलं जात आहे. मात्र याच वेळी कंपनीकडून शक्तिशाली संगणकीय प्रणाली, डेटा सेंटर्स आणि एआय इन्फ्रास्ट्रक्चरवर मोठ्या प्रमाणात खर्च केला जात आहे. या निर्णयामुळे OpenAI चं व्यवसाय मॉडेल आता गूगल आणि मेटा सारख्या तंत्रज्ञान दिग्गजांच्या अधिक जवळ जात आहे, ज्यांनी मोफत सेवांवर आधारित जाहिरात साम्राज्य उभारलं आहे.
इतर एआय कंपन्यांच्या तुलनेत गूगल, मेटा आणि ॲमेझॉनकडे आधीपासूनच मजबूत जाहिरात व्यवसाय आहे. ॲमेझॉनने आपल्या शॉपिंग आणि व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवरून मोठ्या प्रमाणात जाहिरात महसूल उभारला आहे. ईमार्केटरचे विश्लेषक जेरेमी गोल्डमन यांच्या मते, “जाहिराती या जनरेटिव्ह एआयच्या शर्यतीतील अडथळा नसून OpenAI ला या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी मदत करतील. ChatGPT वर जाहिराती सुरू करणं म्हणजे ही शर्यत आता फक्त मॉडेलच्या गुणवत्तेपुरती मर्यादित राहिलेली नाही, हे OpenAI मान्य करत आहे.”
हा बदल अशा काळात होत आहे, जेव्हा गूगल जनरेटिव्ह एआयच्या शर्यतीत आघाडी घेत असून जीमेल, मॅप्स आणि यूट्यूबसह अनेक सेवांमध्ये एआय फीचर्स समाविष्ट करत आहे. यामुळे ChatGPT आणि गूगलच्या जेमिनी चॅटबॉटमधील स्पर्धा अधिक तीव्र होत आहे.
दरम्यान, OpenAI चे सीईओ सॅम अल्टमन यांनी याआधी अनेकदा जाहिरातींबाबत आपली नापसंती व्यक्त केली होती. जाहिरातींमुळे ChatGPT च्या उत्तरांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतं, अशी त्यांची चिंता होती. ही भीती दूर करण्यासाठी OpenAI ने स्पष्ट केलं आहे की, जाहिरातींचा ChatGPT च्या उत्तरांवर कोणताही परिणाम होणार नाही. वापरकर्त्यांची संभाषणे जाहिरातदारांपासून पूर्णपणे खाजगी राहतील आणि जाहिराती नेहमी वेगळ्या व स्पष्टपणे चिन्हांकित असतील.
महसुलापेक्षा विश्वासाला प्राधान्य
ही घोषणा OpenAI च्या ॲप्लिकेशन्स सीईओ फिजी सिमो यांनी केली आहे. “ChatGPT ला सुरुवातीपासून मौल्यवान बनवणाऱ्या गोष्टींचं संरक्षण करणं आमच्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे,” असं त्यांनी ब्लॉग पोस्टमध्ये म्हटलं आहे. “ChatGPT ची उत्तरे उपयुक्ततेवर आधारित असतील, जाहिरातींवर नाही, यावर वापरकर्त्यांचा विश्वास असणं आवश्यक आहे.”
OpenAI च्या मते, महसुलापेक्षा वापरकर्त्यांचा विश्वास आणि अनुभव अधिक महत्त्वाचा आहे. मात्र, वापरकर्त्यांच्या भावनिक सहभागासंबंधी कंपनीवर याआधी टीका झाली असून, अशा पार्श्वभूमीवर जाहिरातींच्या निर्णयाकडेही बारकाईने पाहिलं जात आहे. तरीही, OpenAI ने स्पष्ट केलं आहे की ChatGPT च्या मूलभूत विश्वासार्हतेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही.

