(पुणे / वृत्तसंस्था)
विधानपरिषदेच्या पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीतील जागावाटपाचा तिढा कायम असतानाच शिवसेनेचे मंगेश चिवटे यांनी मोठे शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. मंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत चिवटे यांनी अर्ज भरला. भाजपकडून कौस्तुभ गावडे यांना यापूर्वीच उमेदवारी देण्यात आली असून, दोन्ही पक्षांचे उमेदवार रिंगणात आल्याने महायुतीतील अंतर्गत पेच कायम असल्याचे चित्र आहे.
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर मंगेश चिवटे यांनी शिक्षकांच्या प्रश्नांवर ठोस भूमिका मांडली. आमदार झाल्यानंतर एका वर्षाच्या आत शिक्षकांचे जुनी पेन्शन योजना, प्रचलित नियमांनुसार टप्पा वाढ आणि शिक्षकांसाठी कॅशलेस आरोग्य विमा योजना हे तीन प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले. हे प्रश्न वर्षभरात सुटले नाहीत, तर आपण आमदारकीचा राजीनामा देऊ, तसेच तोपर्यंत आमदारकीचे मानधनही स्वीकारणार नाही, असे चिवटे यांनी स्पष्ट केले.
“मी कुठल्याही शिक्षण सम्राटाचा मुलगा किंवा शिक्षण महर्षींचा नातू नाही. मी सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेला कार्यकर्ता आहे,” असे सांगत चिवटे यांनी शिक्षकांच्या प्रश्नांसाठी केलेल्या कामाचा उल्लेख केला. गेल्या अनेक वर्षांपासून टप्पा अनुदानाच्या मागणीसाठी आझाद मैदानावरील आंदोलनात सहभागी झाल्याचे त्यांनी सांगितले. स्वाभिमानी शिक्षक सेनेच्या माध्यमातून गेल्या दोन-तीन वर्षांत पुणे विभागातील पाचही जिल्ह्यांतील शिक्षकांशी थेट संपर्क साधून सुमारे 22 हजार शिक्षक मतदारांची नोंदणी केल्याचा दावाही त्यांनी केला.
दरम्यान, महायुतीतील जागावाटपावर मंत्री उदय सामंत यांनी भूमिका स्पष्ट केली. प्राथमिक चर्चेनुसार नागपूर पदवीधर जागा भाजपकडे, अमरावती शिक्षक जागा शिवसेनेकडे, तर संभाजीनगरची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेल्याचे त्यांनी सांगितले. पुणे शिक्षक मतदारसंघावर शिवसेनेचा सुरुवातीपासूनच दावा असल्याने पक्षाने मंगेश चिवटे यांना ‘एबी’ फॉर्म देऊन अधिकृत उमेदवारी दिल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले. भाजपनेही आपला उमेदवार दिला असून दोन्ही पक्षांनी आपापल्या कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर केला असल्याचे त्यांनी सांगितले.
आता महायुतीचे नेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे हे एकत्र बसून 9 तारखेपर्यंत योग्य तो मार्ग काढतील, असे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. वरिष्ठ नेतृत्व जो निर्णय घेईल, तो सर्वांना मान्य असेल, अशी भूमिका त्यांनी मांडली. त्यामुळे पुणे शिक्षक मतदारसंघातील महायुतीचा उमेदवारीचा पेच 9 तारखेपर्यंत सुटतो का, याकडे लक्ष लागले आहे.


