(रत्नागिरी / वार्ताहर)
महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ संलग्न भारतीय मजदूर संघाची प्रदेश कार्यकारणी बैठक ३ व ४ ऑक्टोबर रोजी पुणे येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या बैठकीला राज्यभरातून सुमारे ८० पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत वीज कंत्राटी कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करून त्यांच्या मागण्यांसाठी २७ ऑक्टोबर रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांसह महावितरणच्या मुख्यालयावर, प्रकाशगड, बांद्रा, मुंबई येथे आंदोलन करण्याचा निर्धार सर्वानुमते करण्यात आला.
क्रिस्टल व स्मार्ट एजन्सीसह राज्यातील सर्व वीज कंत्राटी कामगारांना दिवाळीपूर्वी बोनस, वेतन आणि फरकाची रक्कम मिळावी, जादा कामाचा मोबदला देण्यात यावा, कामगार बदली धोरण रद्द करावे, तसेच कंत्राटदारांनी सूडभावनेतून कामगारांना एकतर्फी कमी करू नये, अशा मागण्या संघटनेने केल्या आहेत. न्यायालयाने संरक्षित केलेल्या आणि कमी करण्यात आलेल्या कामगारांना पुन्हा कामावर घ्यावे, त्यांच्या याद्या संपर्क पोर्टलवर दाखवाव्यात, कंत्राटदार बदलला तरी कामगार तेच राहावेत, सेवाज्येष्ठ कामगारांना रोजगार मिळावा आणि मेडिक्लेमची सुविधा उपलब्ध करून द्यावी, यासह अन्य मागण्यांसाठी आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला.
मागील काळात कामगारांना केवळ आश्वासने मिळाली असून आता ठोस कृतीची गरज आहे. मागण्या पूर्ण न झाल्यास दिवाळीत ६ नोव्हेंबरपासून कामबंद आंदोलन करण्याचा निर्धार करण्यात आल्याचे कार्याध्यक्ष राहुल बोडके यांनी सांगितले. देवेंद्रजी फडणवीस यांनी २०२४ साली स्पष्ट निर्देश दिल्यानंतरही प्रशासनाकडून मुजोर कंत्राटदारांवर कारवाई होत नसल्याचा आरोप संघटनेने केला. जीवाची पर्वा न करता जनतेला वीज सेवा देणाऱ्या कामगारांवर मोठा आर्थिक आणि सामाजिक अन्याय होत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती असताना वीज कंत्राटी कामगारांना अनेक महिने वेतन आणि मागील फरकाची रक्कम मिळालेली नाही. प्रशासनाकडून केवळ आश्वासने दिली जात असून त्यांची पूर्तता होत नसल्याने दिवाळीत आंदोलनाशिवाय पर्याय उरलेला नाही, असे संघटनेचे अध्यक्ष निलेश खरात यांनी सांगितले.
बैठकीस कार्याध्यक्ष राहुल बोडके, संघटनमंत्री उमेश आनेराव, कोषाध्यक्ष सागर पवार आणि उपमहामंत्री अमर लोहार यांची प्रमुख उपस्थिती होती. दोन दिवसांच्या विविध सत्रांमध्ये संघटनेच्या आगामी वाटचालीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच नवीन कार्यकारणीला नियुक्तीपत्रे देण्यात आली. बैठकीचे आभार प्रदर्शन पुणे झोन सचिव योगेश महागरे यांनी केले. सदर माहिती रत्नागिरी जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अभिजीत परीट यांनी दिली.


