(संगमेश्वर / प्रतिनिधी)
श्री शारदादेवी मंदिर चॅरिटी ट्रस्ट, तुरंबव यांच्या वतीने यंदाचा नवरात्रोत्सव रविवार, ११ ऑक्टोबर ते मंगळवार, २० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत विविध धार्मिक आणि पारंपरिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. नवरात्रोत्सवानिमित्त मंदिरात भाविकांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, उत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे.
नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी रविवार, ११ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ ते रात्री ११ वाजेपर्यंत देवीचे दर्शन घेता येणार आहे. रात्री ९ वाजता देवीची महाआरती होईल. त्यानंतर रात्री १०.३० वाजता आणि ११.३० वाजता पारंपरिक जाखडी नृत्याचे आयोजन करण्यात आले आहे. रात्री ११.३० वाजल्यापासून संततीविषयक नवस करण्याचा तसेच नवस फेडण्याचा कार्यक्रम होणार आहे.
सोमवार, १२ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ ते रात्री ११ वाजेपर्यंत मंदिर भाविकांसाठी दर्शनासाठी खुले राहणार आहे. रात्री ९ वाजता महाआरती, त्यानंतर रात्री १०.३० वाजता व ११.३० वाजता जाखडी नृत्य होईल. यानंतर संततीविषयक नवस करण्याचा आणि फेडण्याचा कार्यक्रम होणार आहे.
मंगळवार, २० ऑक्टोबर रोजी नवरात्रोत्सवाची सांगता होणार आहे. यानिमित्त सकाळी ८ ते रात्री ११ वाजेपर्यंत देवीचे दर्शन घेता येणार असून, दुपारी ३ ते सायंकाळी ६ या वेळेत सोने लुटणे कार्यक्रम होईल. रात्री ९.३० वाजता महाआरती, त्यानंतर रात्री १०.३० वाजता व ११.३० वाजता पारंपरिक जाखडी नृत्याचे आयोजन करण्यात आले आहे. रात्री १२ नंतर संततीविषयक नवस करण्याचा व फेडण्याचा कार्यक्रम होईल. त्यानंतर श्री गौरी देवीचे विसर्जन करण्यात येणार आहे.
दरम्यान, रात्री ११ वाजता नवस करण्याचे अथवा फेडण्याचे काम सुरू झाल्यानंतर देवीचे दर्शन भाविकांसाठी केवळ मुखदर्शनाच्या स्वरूपात खुले राहणार आहे. नवरात्रोत्सवानिमित्त मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता असून, भाविकांनी धार्मिक कार्यक्रमांना उपस्थित राहून सहकार्य करावे, असे आवाहन श्री शारदादेवी मंदिर चॅरिटी ट्रस्ट, तुरंबव यांच्या वतीने करण्यात आले आहे.


