(राजापूर / तुषार पाचलकर)
शहराच्या सौंदर्यात भर घालण्यासह नागरिकांना विरंगुळा, मनोरंजन आणि निवांत वेळ घालवण्यासाठी हक्काचे ठिकाण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राजापूर नगरपरिषदेच्या वतीने ‘नमो उद्यान’ विकसित करण्यात येणार आहे. शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी या उद्यानाच्या उभारणीकरिता एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ गुरुवारी आमदार किरण (भैय्या) सामंत यांच्या हस्ते भूमिपूजन करून करण्यात आला.
राजापूर शहरातील साई मंदिराजवळ, नगर वाचनालयाच्या मागील बाजूस गुरुवारी सकाळी ११ वाजता हा भूमिपूजन सोहळा पार पडला. यावेळी राजापूर नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा ॲड. हुस्नबानू खलिफे यांची प्रमुख उपस्थिती होती.
शहराच्या विकासाच्या दृष्टीने ‘नमो उद्यान’ हा महत्त्वपूर्ण प्रकल्प ठरणार आहे. या उद्यानाच्या माध्यमातून लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच अन्य शहरवासीयांना मनोरंजन आणि विरंगुळ्यासाठी सुंदर व आनंददायी परिसर उपलब्ध होणार आहे. नागरिकांना दैनंदिन धावपळीतून काही वेळ निवांत घालवता यावा, तसेच शहरातील सार्वजनिक सुविधांमध्ये भर पडावी, हा या प्रकल्पामागील उद्देश आहे.
एक कोटी रुपयांच्या निधीतून साकारण्यात येणाऱ्या या उद्यानामुळे राजापूर शहराच्या सौंदर्यात आणखी भर पडण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. उद्यानाचे काम दर्जेदार पद्धतीने आणि नियोजित वेळेत पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
या भूमिपूजन सोहळ्याला राजापूर शहरातील नागरिक, लोकप्रतिनिधी, नगरपरिषदेचे पदाधिकारी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.


