(संगमेश्वर / प्रतिनिधी)
तीव्र उन्हाळ्याने संपूर्ण कोकण करपून निघाले असतानाच पावसाच्या आगमनाची चाहूल लागल्यावर निसर्गात एक वेगळीच उल्हासाची लहर पसरते. पुर्ये तर्फे देवळे (ता. संगमेश्वर) येथील शंकर वैद्य यांच्या घराशेजारील परिसरात असेच एक नयनरम्य व दुर्मीळ दृश्य गुरुवारी सकाळी पाहायला मिळाले. मोराने आपला बहुरंगी पिसारा फुलवत थुईथुई नाचत “मॅओऽऽ मॅओ” अशी साद घालून पावसाच्या आगमनाची झलक दिली.
वैद्य कुटुंबियांनी घराशेजारील परिसरात पक्ष्यांसाठी मातीच्या भांड्यात पाणी ठेवण्याचा उपक्रम सुरू केला आहे. यामुळे उन्हाच्या काहिलीने व्याकुळ झालेले मोर, रानकोंबड्या व इतर अनेक पक्षी येथे पाणी पिण्यासाठी आकर्षित होतात. या छोट्याशा उपक्रमातून सजीवसृष्टीस दिलासा मिळत आहे. गुरुवारी सकाळी अचानक वातावरणात गारवा निर्माण झाला. आकाशात जमलेल्या ढगांनी पावसाचे संकेत दिले आणि ते जाणवताच परिसरात वास्तव्यास असलेल्या मोराने आनंदाने पिसारा फुलवत नृत्य सुरू केले. हे दृश्य शंकर वैद्य यांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केले आहे.
पावसाचे आगमन हे नुसते हवामानातील बदल नसून, निसर्गातील प्रत्येक सजीवासाठी तो नवा श्वास घेण्याची संधी असतो. मनुष्याप्रमाणेच प्राणी-पक्षीही पावसाची आतुरतेने वाट पाहत असतात. त्यांच्या या उत्कट भावनांची जाणीव ठेवत वैद्य कुटुंबियांनी सुरू केलेला पाणी उपक्रम खरोखरच अनुकरणीय ठरत आहे.
निसर्गाच्या सान्निध्यात, पावसाच्या स्वागतासाठी सजलेले हे चित्र मन मोहून टाकणारे आहे. अशा दृश्यांमधून निसर्गाच्या सूक्ष्म बदलांची नोंद घेत, त्यांच्याशी नाते घट्ट करत राहणे हीच खरी पर्यावरण स्नेही वृत्ती होय.

