(संगमेश्वर /रत्नागिरी प्रतिनिधी)
देवरूख येथील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र श्री क्षेत्र मार्लेश्वर येथे डोंगरावरून दगड कोसळून सांगलीच्या निष्पाप चिमुकलीचा बळी गेल्यानंतर संपूर्ण राज्यभर संतापाची लाट उसळली असताना आणि इतर लोकप्रतिनिधींनी घटनास्थळी धाव घेऊन बैठकांचा धडाका लावला असताना, स्थानिक आमदार शेखर निकम यांनी अखेर गुरुवारी देवरूख येथे पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. प्रकृती ठीक नसल्याने तात्काळ घटनास्थळी येता आले नसल्याचे कारण देत त्यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. “मी पाटील कुटुंबाच्या दुःखात सहभागी असून घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश प्रशासनाला दिले आहेत,” अशी ग्वाही त्यांनी दिली; मात्र स्थानिक आमदारांची ही उपस्थिती ‘उशिरा का होईल हजेरी लावल्याची कुजबुज आता राजकीय व सामाजिक वर्तुळात सुरू झाली आहे.
देवदर्शनासाठी आनंदाने आलेल्या सांगलीतील ऋत्वी पाटील या चिमुकलीवर काळाने घातलेल्या घावामुळे संपूर्ण परिसर सुन्न झाला आहे. या पार्श्वभूमीवर देवरूख येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात आमदार निकम यांनी पत्रकारांशी संवाद साधला. “ही घटना अत्यंत दुर्दैवी, वेदनादायी आणि मन हेलावून टाकणारी आहे. या कठीण प्रसंगी मी ऋत्वीच्या कुटुंबासोबत आहे. मी प्रत्यक्ष येऊ शकलो नसलो, तरी पदाधिकारी आणि प्रशासनाच्या सातत्याने संपर्कात होतो,” असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. तीर्थक्षेत्राचा विकास होत असताना भाविकांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष होता कामा नये, अशी भूमिका आमदार निकम यांनी मांडली. डोंगराळ परिसरात विकासकामे करताना नैसर्गिक रचना, डोंगराची स्थिती आणि पर्यावरण यांचा विचार करणे अत्यावश्यक आहे. या दुर्घटनेची सखोल चौकशी करून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी तात्पुरत्या उपाययोजनांऐवजी कायमस्वरूपी सुरक्षिततेचे नियोजन करावे, अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली.
तसेच दर्शनमार्गावरील धोकादायक ठिकाणे निश्चित करून तिथे संरक्षक जाळ्या, सूचना फलक आणि आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. एकंदरीत, मार्लेश्वर दुर्घटनेनंतर इतर आमदारांनी आधीच आक्रमक पवित्रा घेत प्रशासन आणि ठेकेदाराला धारेवर धरले असताना, स्थानिक आमदारांनी उशिरा का होईना या प्रकरणाची दखल घेतल्याने आता दोषी ठेकेदारावर प्रत्यक्षात काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


