(संगमेश्वर/ रत्नागिरी प्रतिनिधी)
संगमेश्वर तालुक्यातील देवरुख येथील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र श्री क्षेत्र मार्लेश्वर येथे डोंगरावरून दगड कोसळून चार वर्षांच्या निष्पाप चिमुकलीचा बळी गेल्यानंतर आणि ग्रामस्थांसह राज्यभरातून संतापाचा भडका उडाल्यानंतर अखेर प्रशासनाला जाग आली आहे. या दुर्घटनेची गंभीर दखल घेत राजापूर-लांजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांच्या पुढाकाराने बुधवारी प्रशासन आणि ग्रामस्थांची तातडीची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत संपूर्ण मार्लेश्वर गुहा आणि डोंगरपरिसराचे तज्ज्ञांमार्फत ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, आगामी जानेवारीतील यात्रेपूर्वी सर्व सुरक्षा उपाययोजना युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे सक्त निर्देश देण्यात आले आहेत.
गेल्या आठवड्यात दर्शनासाठी आलेल्या भाविकांवर डोंगरावरून दगड कोसळून सांगलीच्या ऋत्वी पाटील या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला होता, तर अन्य दोघे जखमी झाले होते. पुलाच्या कामासाठी ठेकेदाराने घडवून आणलेल्या बेसुमार सुरुंग स्फोटांमुळेच डोंगरावरील खडक सैल झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला होता. जानेवारी आणि एप्रिल महिन्यात लेखी इशारे देऊनही सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ठेकेदाराने डोळेझाक केल्याने ग्रामस्थांनी ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची आक्रमक मागणी लावून धरली होती. जनभावनेचा उद्रेक लक्षात घेऊन आमदार किरण सामंत यांनी बुधवारी प्रशासनाची बैठक घेत कामाचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी त्यांनी संबंधित ठेकेदाराला कामातील त्रुटी आणि बेजबाबदारपणाबद्दल चांगलेच धारेवर धरत खडे बोल सुनावले. भाविकांच्या जिवाशी कोणताही खेळ खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा देत त्यांनी भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी ठोस कृती आराखडा राबवण्याच्या सूचना यंत्रणेला दिल्या.
जानेवारी महिन्यात मार्लेश्वरची मोठी यात्रा भरणार असून राज्यभरातून लाखो भाविक दर्शनासाठी येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर मार्लेश्वर गुहा आणि संपूर्ण डोंगरकड्याची तज्ज्ञांकडून तांत्रिक व भौगोलिक तपासणी म्हणजेच स्ट्रक्चरल ऑडिट तातडीने करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. तसेच डोंगरावरील सैल झालेले दगड तज्ज्ञांच्या देखरेखीखाली सुरक्षितरीत्या हटवून संभाव्य दरडीचा धोका कमी करणे आणि वाहनतळापासून मंदिर व धबधब्यापर्यंतच्या संपूर्ण मार्गावर मजबूत संरक्षक जाळ्या बसवण्याचे काम यात्रेपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या महत्त्वपूर्ण बैठकीला तहसीलदार अमृता साबळे, पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, सभापती शर्वरी वेल्ये, शिवसेना (शिंदे गट) तालुकाप्रमुख प्रमोद पवार, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तालुकाप्रमुख बंड्या बोरूकर, जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रसाद सावंत, माजी उपसभापती अजित गावणकर, छोट्या गावणकर, नगरसेवक बाळा कामेरकर, सचिन मांगले, मुशीचे माजी सरपंच मंगेश दळवी, आकाश भोपळे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. आता केवळ बैठकांचे सोपस्कार आणि आदेशांचे कागदी घोडे न नाचवता, प्रशासनाकडून या सर्व सुरक्षा उपाययोजना प्रत्यक्षात आणि वेळेत कशा राबवल्या जातात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.


