(संगमेश्वर)
तालुक्यातील पुर्ये तर्फे देवळे येथील मुख्य रस्त्यावर बौद्धवाडी लगत असलेला जुना कॉजवे गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पूर्णपणे खचला असून, सध्या त्यावरील वाहतूक अत्यंत धोकादायक बनली आहे.
या मार्गावरून पुर्ये बौद्धवाडी, ओझरवाडी, घडशीवाडी, धनगरवाडी, गवळीवाडी आणि कोचरी परिसरातील नागरिकांची नियमित ये-जा असते. विशेषतः पुर्ये गावापासून हायस्कूल, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालये दूर असल्यामुळे विद्यार्थ्यांना दुचाकीवरून प्रवास करावा लागतो. मात्र सध्या कॉजवेचा बराच भाग खचल्याने या विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. ग्रामपंचायतीमार्फत ग्रामस्थांना ‘पाहणी करूनच वाहतूक करावी’, असा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
दरम्यान, सदर धोकादायक कॉजवेची पाहणी पुर्ये उपसरपंच बापू लोटणकर, ग्रामपंचायत सदस्य मधुकर पवार, तंटामुक्ती अध्यक्ष एकनाथ शिंदे, ग्रामपंचायत अधिकारी विशाल कांबळे, पोलीस पाटील कांबळे आणि तलाठी चौगुले यांनी केली. तातडीने दुरुस्तीच्या उपाययोजना न झाल्यास संभाव्य अपघात टाळता येणार नाहीत, अशी चिंता स्थानिकांनी व्यक्त केली आहे.