(रत्नागिरी /प्रतिनिधी)
मिरकरवाडा जेटी येथे मच्छी खरेदीच्या कारणावरून झालेल्या वादातून मच्छीमार सप्लायरवर दोघांनी हल्ला केल्याची घटना ३ ऑक्टोबर रोजी रात्री घडली. लोखंडी फायटने डोके, चेहरा, छाती आणि पाठीवर मारहाण केल्याने संबंधित व्यक्ती जखमी झाली. त्यानंतर चाकूने वार करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोपही फिर्यादीने केला आहे. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रज्जाक हमजा साब (वय ४३, रा. सिद्धिविनायक अपार्टमेंट, शिवाजीनगर, रत्नागिरी) हे मच्छीमार सप्लायर असून ३ ऑक्टोबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास मिरकरवाडा जेटी येथे मच्छी खरेदीसाठी गेले होते. त्यावेळी शफिक महमद शरीफ दर्वे (वय ४५) आणि अब्दुल्ला शफिक दर्वे (वय २२, दोघेही रा. मिरकरवाडा) तेथे आले. संशयित आरोपींनी ‘तुला मिरकरवाडा येथे मच्छी खरेदी करण्याची डेअरिंग कशी झाली?’ असे म्हणत त्यांच्याशी वाद घातला. त्यानंतर शफीक दर्वे याने त्यांना घट्ट पकडून ठेवले, तर अब्दुल्ला दर्वे याने लोखंडी फायटने डोके, चेहरा, छाती आणि पाठीवर मारहाण केली. या मारहाणीत रज्जाक साब खाली पडल्याचे फिर्यादीत नमूद आहे. यानंतर आरोपी क्रमांक एकने ‘तुझी मर्डर करतो’ अशी धमकी देत पॅन्टमध्ये लपविलेला चाकू बाहेर काढून वार करण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीने म्हटले आहे. रज्जाक साब यांनी त्याचा हात पकडण्याचा प्रयत्न केला असता चाकू कपाळावर लागल्याने जखम होऊन रक्तस्राव झाल्याचे तक्रारीत नमूद आहे.
घटनेनंतर तेथील साक्षीदार आणि ग्रामस्थांनी हस्तक्षेप करून रज्जाक साब यांची संशयित आरोपींच्या ताब्यातून सुटका केली. त्यांना उपचारासाठी रत्नागिरीतील सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे ३ ऑक्टोबर रोजी एमएलसी क्रमांक ३११६/२०२६ नुसार वैद्यकीय नोंद करण्यात आली. त्यानंतर त्यांच्या फिर्यादीवरून रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी भारतीय न्यायसंहिता, २०२३ मधील कलम ११८(१), ३५१(३) आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.


