(देवळे / प्रकाश चाळके)
देवरुख आगारातून लांजा मार्गावर धावणाऱ्या साध्या एसटी बसऐवजी शिवशाही बस सोडली जात असल्याने प्रवाशांना दुप्पट भाड्याचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे या शिवशाही बसचा एसी बंद असतानाही बसच्या काचा बंद असल्याने प्रवाशांना उकाडा आणि गुदमरलेल्या वातावरणात प्रवास करावा लागत आहे. या प्रकारामुळे प्रवासी वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त होत असून, देवरुख आगाराने प्रवाशांची होणारी गैरसोय आणि अतिरिक्त भाड्याचा बोजा तातडीने थांबवावा, अशी मागणी होत आहे.
देवरुख-लांजा बस साखरपा मार्गे दाभोळ येथून लांजाकडे जाते. या मार्गावर साधी एसटी बस उपलब्ध करून दिल्यास प्रवाशांना कमी भाड्यात प्रवास करता येऊ शकतो. मात्र, त्याऐवजी शिवशाही बस सोडली जात असल्याने प्रवाशांना अधिक भाडे मोजावे लागत आहे. त्यातच संबंधित बसचा एसी बंद असून, काचा पूर्णपणे बंद असल्याने प्रवाशांना उकाड्याचा आणि अस्वस्थ वातावरणाचा सामना करावा लागत असल्याची तक्रार प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
एसी बंद असलेल्या आणि पूर्ण काचा बंद असलेल्या शिवशाही बसमधून अधिक भाडे आकारून प्रवाशांना प्रवास करावा लागत असेल, तर या परिस्थितीला जबाबदार कोण, असा सवाल प्रवासी वर्गातून उपस्थित केला जात आहे. देवरुख आगारप्रमुखांनी स्वतः अशा बसमधून एक दिवस प्रवास करून पाहावा, म्हणजे प्रवाशांना नेमक्या कोणत्या त्रासाला सामोरे जावे लागते, याची जाणीव होईल, अशी संतप्त प्रतिक्रिया प्रवाशांनी व्यक्त केली.
प्रवाशांची आर्थिक लूट आणि होणारी गैरसोय लक्षात घेता देवरुख आगारप्रमुखांनी तातडीने देवरुख-लांजा मार्गावर साधी एसटी बस सुरू करावी, तसेच प्रवाशांना अतिरिक्त भाडे आणि गैरसोयीचा सामना करावा लागू नये, यासाठी योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.

