(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर शहरासह आजूबाजूच्या गाव परिसरात बिबट्याचा मुक्त संचार सुरू असून स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नर व मादी बिबट्या आपल्या पिल्लांसह जंगल भाग सोडून रस्त्यांवर, मानवी वस्त्यांत आणि महामार्गालगतच्या भागांत भटकंती करताना दिसत आहेत. भटके व पाळीव प्राण्यांवर हल्ले करण्यासाठी बिबटे गावात घुसत असल्याची प्रकरणे समोर येत आहेत.
काही दिवसांपूर्वी असुर्डे येथे एका मादी बिबट्याचा पिल्लू अज्ञात वाहनाच्या धडकेने मृत्यूमुखी पडला होता. त्यानंतर त्या पिल्लाला शोधण्यासाठी मादी बिबट्या सतत फिरताना दिसत असून तिच्या डरकाळ्यांनी स्थानिक नागरिक भयभीत झाले आहेत.
महामार्गावर बिबट्याचे दर्शन
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगत पुनर्वसन भागातील मुख्य रस्त्यावर काही वाहनचालकांना बिबट्या रस्ता ओलांडताना दिसला. पार्थ प्रकाश खातू या युवकाने प्रसंगावधान राखून आपल्या गाडीतून बिबट्याचे दृश्य मोबाईल कॅमेऱ्यात टिपले.
पोलीस वसाहतीत बिबट्याचे वावर
राष्ट्रीय महामार्गालगतच्या मापारी मोहल्ला आणि पोलीस वसाहतीच्या परिसरात बिबट्याचे कुटुंब दिसल्याने चिंता वाढली आहे. मापारी मोहल्ला जमात अध्यक्ष अब्दुल रउफ नूर खान यांच्या सीसीटीव्हीत मादी बिबट्या दोन बछड्यांसह पोलीस वसाहतीच्या दिशेने जाताना कैद झाली आहे. त्यामुळे पोलिसांचे कुटुंबीय सुद्धा धास्तावले आहेत.
मशीद परिसरातील घटना
रामपेठ मार्गावरील मापारी मोहल्ला मशीद परिसरातही बिबट्या बराच वेळ थांबून नंतर रस्त्यावरून जंगलाकडे निघून गेल्याचे स्थानिकांनी प्रत्यक्ष पाहिले.
नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
दररोज कुठे ना कुठे बिबट्याचे दर्शन किंवा डरकाळी यामुळे संगमेश्वर शहर व परिसरात दहशत निर्माण झाली आहे. मुंबई-गोवा महामार्गावर रात्रीच्या वेळी वाहनचालकांनाही बिबट्याचे दर्शन होत असल्याच्या चर्चा वाढल्या आहेत.
वनविभागाने वेळेत कारवाई करून बिबट्याच्या हालचालींवर नियंत्रण ठेवले नाही, तर मोठी जीवितहानी होण्याची शक्यता असल्याचे नागरिकांचे मत आहे.

