(दापोली /रत्नागिरी)
दापोली तालुक्यातील ताडील बागवाडी येथे झाडे तोडण्याच्या कामासाठी आलेला पालघर जिल्ह्यातील ३९ वर्षीय मजूर कावीळ झाल्याचे सांगून गावी जाण्यासाठी निघाल्यानंतर बेपत्ता झाला आहे. त्याचा नातेवाईक, शेजारी तसेच परिसरात शोध घेऊनही ठावठिकाणा लागला नसल्याने त्याच्या अपहरणाचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. याप्रकरणी दापोली पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अशोक केवजी फडवळे (वय ३९, रा. पिंपळकडा, सारसुन, ता. जव्हार, जि. पालघर) हे दापोली तालुक्यातील ताडील बागवाडी येथे नियाज अब्दुल्ला अराई यांच्याकडे झाडे तोडण्याचे काम करीत होते. २९ सप्टेंबर रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास अशोक फडवळे यांना कावीळ झाल्याने गावी पालघर येथे जात असल्याचे सांगून ते तेथून निघून गेले. मात्र, त्यानंतर ते घरी पोहोचले नसल्याचे त्यांच्या पत्नी जयवंती अशोक फडवळे यांच्या निदर्शनास आले.
पती घरी न परतल्याने जयवंती यांनी नातेवाईक, शेजारी तसेच आजूबाजूच्या परिसरात त्यांचा शोध घेतला. विविध ठिकाणी चौकशी करूनही अशोक फडवळे यांचा ठावठिकाणा लागला नाही. त्यामुळे ते कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी पळवून नेले असावे, असा संशय व्यक्त करीत जयवंती यांनी दापोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात भारतीय न्यायसंहिता, २०२३ मधील कलम १४०(३) अन्वये गुन्हा दाखल केला असून, अशोक फडवळे यांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू केला आहे. बेपत्ता व्यक्तीचा ठावठिकाणा आणि त्यांच्यासोबत नेमके काय घडले, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.


