(दापोली)
तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमधून केंद्रस्तर ते तालुकास्तरीय चाळणी परीक्षेतून इस्रो–नासा अभ्यास दौऱ्यासाठी जिल्हास्तर चाळणी परीक्षेत दापोलीतून निवड झालेल्या “त्या दहा” विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रयोग प्रात्यक्षिक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांना प्रयोगाधारित मार्गदर्शनाची गरज ओळखून सेवा भारती कोकण प्रांत ट्रस्टच्या वतीने जालगावचे अजिंक्य तलाठी यांच्या स्मरणार्थ सुधीर तलाठी यांनी ही दोन दिवसीय कार्यशाळा आयोजित केली. या कार्यशाळेत ट्रस्टचे मार्गदर्शक शिक्षक दिनेश नाटेकर विद्यार्थ्यांना प्रयोग दिग्दर्शन व प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांचे मार्गदर्शन करत आहेत.
कोकण प्रांत ट्रस्टच्या माध्यमातून तालुक्यातील अनेक शाळांमध्ये दरमहा प्रत्यक्ष शालेय मार्गदर्शन दिले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होण्यास मोठी मदत होत असल्याचे मत ६ व ७ जानेवारी रोजी झालेल्या दोन दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी दापोलीचे गटशिक्षणाधिकारी रामचंद्र सांगडे यांनी व्यक्त केले.
जालगाव येथील केंद्रशाळेत ही कार्यशाळा आयोजित केल्याबद्दल दापोली तालुक्याचे माजी उपसभापती मनोज भांबीड यांनी समाधान व्यक्त करत विद्यार्थ्यांना जिल्हास्तर चाळणी परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी जालगाव ग्रामपंचायतीचे माजी सदस्य विलास जालगावकर, आयोजक सुधीर तलाठी, शिरीष देसाई, प्रयोगशाळा मार्गदर्शक शिक्षक दिनेश नाटेकर, त्या दहा विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक शिक्षक तसेच शाळेतील शिक्षक उपस्थित होते.

