(दापोली /रत्नागिरी)
तालुक्यातील भडवळे-शेरी भोईवाडी बसथांबा परिसरात उभी असलेल्या एसटी बसमधून डिझेल चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका सराईत चोरट्याला दापोली पोलिसांनी मध्यरात्रीच्या सुमारास रंगेहाथ पकडले. विशेष म्हणजे, संशयिताच्या ताब्यातील कारची झडती घेतली असता त्यातून गावठी बनावटीची बंदूक आणि जिवंत काडतूस आढळून आल्याने या कारवाईला अधिक गंभीर स्वरूप प्राप्त झाले आहे.
या प्रकरणी गौतम मनोहर रुखे (रा. दयाळ रुखेवाडी, ता. खेड) याला अटक करण्यात आली असून, रविवारी (२९ मार्च) पहाटे सुमारे एक वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एसटीचे वाहक निवृत्ती सखाराम पवार यांनी याबाबत फिर्याद नोंदविली आहे. फिर्यादीनुसार, एसटी बस (एमएच २० बीएल १५३५) ही भडवळे येथे मुक्कामी उभी होती. त्यावेळी संशयित गौतम रुखे हा त्याच्या कारने (एमएच ०१ डीआर ३४५१) घटनास्थळी आला. त्याने बसच्या डिझेल टाकीचे झाकण उघडून पाइपच्या सहाय्याने डिझेल काढण्यास सुरुवात केली. याचवेळी पोलिसांनी सापळा रचून त्याला रंगेहाथ पकडले. त्यानंतर पोलिसांनी संशयिताच्या कारची कसून तपासणी केली असता, त्यामध्ये विनापरवाना बेकायदेशीररीत्या ठेवलेली १२ बोअरची सिंगल नळीची गावठी बनावटीची बंदूक तसेच १२ बोअरचे एक जिवंत काडतूस आढळून आले. या जप्तीमुळे आरोपीच्या हालचालींबाबत संशय अधिक गडद झाला आहे.
याप्रकरणी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३०५ (बी)(इ) तसेच शस्त्र अधिनियम १९५९ च्या कलम २५ (१-ख)(क) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यासाठी सात वर्षांपर्यंत कारावासाची तरतूद असून आरोपीचा पूर्व गुन्हेगारी इतिहास आहे का, याचाही पोलिसांकडून तपास सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस हवालदार अभिजित पवार करीत आहेत.

