(दापोली /रत्नागिरी)
घरातून बाहेर पडल्यानंतर सहा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या ५१ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह कुंभवे येथील जंगलमय भागात आढळून आला. संतोष जयराम तांबे (वय ५१, रा. इनामपांगारी-बौद्धवाडी, ता. दापोली) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. २१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संतोष तांबे हे १५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास घरातून बाहेर पडले होते. त्यानंतर ते घरी परतले नाहीत. कुटुंबीय, मुलगा, नातेवाईक आणि ग्रामस्थ त्यांचा शोध घेत होते. सहा दिवसांनंतर २१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास कुंभवे गावच्या हद्दीतील सामाजिक वनीकरणाच्या जंगलमय परिसरात ते मृतावस्थेत आढळले. त्यानंतर रुग्णवाहिकेतून त्यांना दापोली येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रात्री ८.१० वाजता तपासणी करून रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक ७९/२०२६ अन्वये भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बीएनएसएस) कलम १९४ प्रमाणे नोंद करण्यात आली आहे. तांबे यांचा मृत्यू नेमका कोणत्या कारणाने झाला, हे स्पष्ट झालेले नसून, पोलिसांकडून पुढील कार्यवाही सुरू आहे.


