(दापोली / वार्ताहर)
‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत जिल्हा परिषद शाळा साखळोली क्र. १ मधील दोन विद्यार्थिनींनी प्रथम क्रमांक पटकावत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. कु. आद्या विनोद गोरीवले आणि कु. शुभ्रा पंकज घडवले यांनी आपापल्या गटांत प्रथम क्रमांक मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्यात सर्जनशीलता आणि अभिव्यक्ती कौशल्य विकसित व्हावे, तसेच आत्मविश्वास वाढावा, या उद्देशाने ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत दि. ५ ते ७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत रांगोळी, चित्रकला आणि वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यातील वक्तृत्व स्पर्धा दि. ७ ऑक्टोबर २०२६ रोजी आर. आर. वैद्य इंग्लिश मिडीयम स्कूल, दापोली येथे उत्साहात पार पडली.
या स्पर्धेतील लहान गटात कु. आद्या विनोद गोरीवले हिने ‘माझी शाळा सुंदर शाळा’ या विषयावर प्रभावी वक्तृत्व सादर करत तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविला. तर मोठ्या गटात कु. शुभ्रा पंकज घडवले हिने ‘माझ्या स्वप्नातील भारत’ या विषयावर आत्मविश्वासपूर्ण आणि ओजस्वी भाषण करत प्रथम क्रमांक पटकावला.
एकाच शाळेतील दोन विद्यार्थिनींनी दोन वेगवेगळ्या गटांत तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविल्याने जिल्हा परिषद शाळा साखळोली क्र. १ च्या शैक्षणिक आणि सहशैक्षणिक कार्याचे कौतुक होत आहे.
दोन्ही यशस्वी विद्यार्थिनींना श्री. समीर ठसाळ, श्री. संदेश चव्हाण आणि श्रीमती संगिता लोहारे यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या या यशाबद्दल मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, शाळा व्यवस्थापन समिती, पालक आणि ग्रामस्थांनी दोन्ही विद्यार्थिनींचे अभिनंदन केले.


