(गुहागर / रत्नागिरी)
दाभोळ खाडी किनारी नवानगर जेटीलगत असलेल्या प्रवासी पिकअप शेडमध्ये गांजाचे सेवन करीत असल्याच्या आरोपावरून ३० वर्षीय तरुणाविरोधात गुहागर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई ३ ऑक्टोबर रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, अभिजित नागेश पालशेतकर (वय ३०, रा. धोपावे, विघ्नहर्तावाडी, ता. गुहागर) हा नवानगर जेटीलगतच्या प्रवासी पिकअप शेडमधील कठड्यावर गांजाचे सेवन करीत असल्याचे आढळून आल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. त्यानंतर त्याची गुहागर ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर संबंधित व्यक्तीच्या श्वासाला अंमली पदार्थाचा वास येत असल्याचा प्राथमिक अहवाल वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिल्याचे पोलिस तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या अहवालाच्या आधारे पोलिस कर्मचारी राहुल रमेश पवार (वय ३०, पोलीस कॉन्स्टेबल क्रमांक १३९३, नेमणूक गुहागर पोलिस ठाणे) यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुहागर पोलिसांनी संबंधित तरुणाविरोधात एनडीपीएस कायदा, १९८५ मधील कलम ८(क) आणि २७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास गुहागर पोलिसांकडून सुरू आहे.


