(रत्नागिरी /प्रतिनिधी)
निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आणि ‘एसआयआर’ प्रक्रियेला विरोध दर्शवत रत्नागिरीत काँग्रेसच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूकमोर्चा काढण्यात आला. ‘एसआयआर’च्या माध्यमातून मतदारांच्या मतदानाच्या अधिकारावर परिणाम होत असल्याचा आरोप काँग्रेसने केला. या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा अथवा त्यांना पदावरून हटवावे, अशी मागणी करणारे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
सोमवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मूकमोर्चा काढण्यात आला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस रमेश कीर, सरचिटणीस हुस्नबानू खलिफे, दक्षिण रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष जमीर खलिफे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते. प्रसारमाध्यमांशी बोलताना रमेश कीर यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले. निवडणूक आयोग स्वायत्त संस्था असली तरी सध्या त्याच्या निर्णयांबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचा दावा त्यांनी केला. ‘एसआयआर’च्या नावाखाली गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली असून, मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निर्णयांवर सहकाऱ्यांकडून आक्षेप नोंदविण्यात आले असतानाही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी सातत्याने आवाज उठवत असल्याचे सांगत, आंदोलनाचे निवेदन राष्ट्रपतींकडे पाठवून मुख्य निवडणूक आयुक्तांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येणार असल्याचे कीर यांनी सांगितले.
हुस्नबानू खलिफे यांनी २ ते ८ ऑक्टोबरदरम्यान काँग्रेसच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘लोकशाही बचाव आंदोलना’चा हा भाग असल्याचे सांगितले. महाराष्ट्रातील मतदारांना मतदानापासून वंचित ठेवणारी असल्याचा काँग्रेसचा दावा असलेली ‘एसआयआर’ प्रक्रिया तातडीने रद्द करावी, अशी मागणी त्यांनी केली. यासोबतच, या प्रक्रियेसाठी मुख्य निवडणूक आयुक्तांना जबाबदार धरून त्यांना पदावरून हटवावे आणि त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही काँग्रेसने केली. निवडणूक प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणण्यासाठी ईव्हीएमऐवजी पूर्वीप्रमाणे मतपत्रिकेवर निवडणुका घेण्यात याव्यात, अशीही मागणी आंदोलकांनी केली. या मागण्यांवर कार्यवाही न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.


