(गुहागर / सचिन कुळये)
रत्नागिरी जिल्हा शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित ५३व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात आदर्श शाळा सडे जांभारी नं. २ शाळेने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विद्यार्थी प्रतिकृती गटात शाळेने तृतीय क्रमांक पटकावत राज्यस्तरासाठी निवड मिळवली आहे.
या विज्ञान प्रदर्शनात शाळेच्या विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अशा ‘बहुउपयोगी सौर चाळणी’ या विषयावर आधारित मॉडेल सादर केले होते. परीक्षकांनी या प्रतिकृतीतील नावीन्य, उपयुक्तता आणि सादरीकरणाचे विशेष कौतुक केले.
या यशात निकुंज संजय दावडे, वैष्णवी विजय वेलुंडे आणि ऋषिकेश दिलीप डिंगणकर या विद्यार्थ्यांचा मोलाचा सहभाग होता. विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक संतोष रामचंद्र मुंडेकर तसेच शिक्षक उदय सखाराम गोरीवले, पल्लवी पांडुरंग डिंगणकर आणि विशाल चंद्रकांत पवार यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, गावचे सरपंच, उपसरपंच तसेच इतर मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

