(गुहागर)
गुहागर तालुक्यातील गुरववाडी येथील प्रसिद्ध मूर्ती कलाकार आणि चित्रकार संतोष परशुराम गुरव यांचा मृतदेह श्री लक्ष्मीनारायण मंदिराच्या तळ्यात आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. त्यांच्या मृत्यूमागील नेमके कारण स्पष्ट झाले नसून, ही आत्महत्या आहे की अपघात, याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे.
गुरुवारी घराबाहेर पडून बेपत्ता
संतोष गुरव हे गुरुवारी सायंकाळी कोणालाही काही न सांगता घराबाहेर पडले आणि रात्रीपर्यंत घरी न परतल्यामुळे कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. सोशल मीडियावर त्यांचा फोटो प्रसारित करण्यात आला होता. काही नागरिकांनी त्यांना मोडका आगर व चिखली परिसरात पाहिल्याचा दावा केला होता.
मंदिर परिसरात सायकल आणि कपडे आढळले
शुक्रवारी सकाळी साडेआठ ते नऊच्या दरम्यान, श्री लक्ष्मीनारायण मंदिरात पूजेसाठी गेलेल्या गुरुजींना मंदिराच्या आवारात गुरव यांची सायकल आणि अंगावरील कपडे दिसून आले. त्यांनी तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर शोधमोहीम सुरू करण्यात आली. दुपारी, मंदिराच्या तळ्यात पाण्यावर मृतदेह तरंगताना आढळून आला. त्याची ओळख संतोष गुरव यांच्याप्रमाणेच पटली. घटनास्थळी गुहागरचे पोलीस निरीक्षक सचिन सावंत, उपनिरीक्षक संदीप भोपळे, पोलीस पाटील उदय असगोलकर, मिलिंद सुर्वे आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
घटनास्थळी पंचनामा करण्यात आला असून, गुहागर पोलिस ठाण्याकडून अधिक तपास सुरू आहे. संतोष गुरव यांच्या निधनामुळे परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या कला कार्याने ते स्थानिकांमध्ये लोकप्रिय होते.

