(गुहागर)
श्रीमती आर. पी. पालशेतकर विद्यालय, पालशेत येथील एस.एस.सी. मार्च १९८८ बॅचच्या विद्यार्थ्यांचे ५ वे स्नेहसंमेलन रविवार, दि. २४ मे २०२६ रोजी विद्यालय परिसरात आयोजित करण्यात आले आहे. सकाळी ८ ते सायंकाळी ७ या वेळेत होणारा हा मेळावा जुन्या आठवणींना उजाळा देणारा आणि मैत्रीचे बंध अधिक दृढ करणारा ठरणार आहे.
“सरत्या वयाच्या सांजवेळी जीवनाचा अर्थ शोधताना” या भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या स्नेहसंमेलनात तब्बल ३८ वर्षांनंतर शाळेची घंटा पुन्हा दुमदुमणार आहे. बालपणीचे वर्ग, शाळेचा परिसर, मित्र-मैत्रिणी आणि शिक्षक यांच्या आठवणींनी वातावरण भारावून जाणार आहे.
या बॅचमधील विद्यार्थी आज अभियांत्रिकी, विधी, बँकिंग, शिक्षण, प्राध्यापक, अध्यापन, शेती तसेच उद्योग-व्यवसाय अशा विविध क्षेत्रांत कार्यरत असून समाजात त्यांनी आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. या बॅचची यापूर्वी १९९५, १९९७, २०११ आणि २०२२ मध्ये अशी चार स्नेहसंमेलने यशस्वीरीत्या पार पडली असून, यंदाचे ५ वे स्नेहसंमेलन विशेष उत्साहात आयोजित करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे, शालेय ऋणाची जाणीव ठेवत या बॅचच्या विद्यार्थ्यांनी २०१५ साली विद्यालयाच्या भौतिक सुविधांसाठी पुढाकार घेत संपूर्ण शाळा इमारतीचे सुमारे ३ लाख रुपये खर्चून रंगकाम करून दिले होते. या योगदानाबद्दल परिसरात त्यांच्या कार्याचे विशेष कौतुक करण्यात येत आहे.
स्नेहसंमेलनात प्रार्थना, माजी विद्यार्थी व शिक्षकांचा सन्मान, जुन्या आठवणींना उजाळा, मैत्री भोजन, गप्पा-गोष्टी तसेच भावनिक अनुभवांची देवाणघेवाण असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
या कार्यक्रमास एस.एस.सी. मार्च १९८८ बॅचचे सर्व माजी विद्यार्थी आणि शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

