(गुहागर)
संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान स्पर्धा २०२५-२६ मध्ये गुहागर तालुक्याने उल्लेखनीय कामगिरी करत जिल्हाभर आपला ठसा उमटवला आहे. जिल्हास्तरावरील स्पर्धेत गुहागर तालुक्यातील खामशेत ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक पटकावला असून उमराठ ग्रामपंचायतीची दोन विशेष पुरस्कारांसाठी निवड झाली आहे.
जिल्हा परिषद रत्नागिरीच्या जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन विभागामार्फत दरवर्षी संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान स्पर्धा आयोजित केली जाते. यंदाच्या स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण, गुहागर, संगमेश्वर, लांजा, राजापूर आणि रत्नागिरी या नऊ तालुक्यांतील एकूण ८४७ ग्रामपंचायती सहभागी झाल्या होत्या.
तालुकास्तरावरील मूल्यांकनानंतर सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या पहिल्या नऊ ग्रामपंचायतींची जिल्हास्तरीय तपासणी समितीकडून पाहणी करण्यात आली. त्यानुसार खामशेत ग्रामपंचायतीने १९८ गुणांसह जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला, तर राजापूर तालुक्यातील खरवते ग्रामपंचायत १९३ गुणांसह द्वितीय आणि रत्नागिरी तालुक्यातील पानवल ग्रामपंचायत १७९ गुणांसह तृतीय ठरली.
विशेष पुरस्कारांमध्येही गुहागर तालुक्याने बाजी मारली आहे. स्व. वसंतराव नाईक पुरस्कार (घनकचरा, सांडपाणी व मैलागाळ व्यवस्थापन) तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार (पाणी गुणवत्ता व पाणी व्यवस्थापन) या दोन्ही पुरस्कारांसाठी उमराठ ग्रामपंचायतीची निवड झाली आहे. उमराठने अनुक्रमे ५६ पैकी ४८ आणि ३० पैकी २६ गुण मिळवत ही कामगिरी साध्य केली.
तसेच स्व. आबासाहेब खेडकर पुरस्कार (शौचालय व्यवस्थापन) यासाठी संगमेश्वर तालुक्यातील माखजन ग्रामपंचायतीची निवड करण्यात आली आहे. माखजन ग्रामपंचायतीने ६७ पैकी ६२ गुण प्राप्त केले.
संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात उत्कृष्ट यश संपादन करून खामशेत आणि उमराठ ग्रामपंचायतींनी गुहागर तालुक्याचा गौरव वाढवला आहे. या यशामागील लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पंचायत समिती गुहागर यांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

