(रत्नागिरी /प्रतिनिधी)
दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महावितरणने स्वतःच तांत्रिक यंत्रणेला सतर्क राहून सर्व ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यास, वीजखंडित झाल्यास पर्यायी व्यवस्थेतून किंवा तातडीने दुरुस्ती करून तो पूर्ववत ठेवण्यास सूचना दिलेल्या असताना हातखंबा तिठा परिसरात महावितरणचा आदेशच धाब्यावर बसवला जात आहे. ऑक्टोबर हिटच्या असह्य उकाड्याने नागरिक हैराण असतानाच हातखंबा परिसरातील वीजखंडित होण्याच्या प्रकारामुळे नागरिकांच्या त्रासात भर पडत आहे. सोमवारी मेंटेनन्सच्या नावाखाली विद्युतपुरवठा बंद करण्यात आल्याने सकाळच्या वेळेत नागरिकांची चांगलीच गैरसोय झाली. दुरुस्तीचे काम आवश्यक असेल तर वीज बंद करणे अपरिहार्य; मात्र उपलब्ध पर्यायी स्रोतांमधून पुरवठा सुरू ठेवण्याची शक्यता असताना त्याचा विचार केला जातो का? असा सवाल आता उपस्थित होत आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांना सकाळी घरातील दैनंदिन कामे आटोपून नोकरी, व्यवसाय आणि अन्य कामांसाठी बाहेर पडावे लागते. याच धावपळीच्या वेळेत अचानक वीजपुरवठा खंडित झाल्यास घरातील पाण्याची व्यवस्था, स्वयंपाकासह अनेक कामांचा खोळंबा होतो. विशेषतः अनेक घरांमध्ये पाण्यासाठी विद्युतपंपांवर अवलंबून राहावे लागत असल्याने वीजखंडित होण्याचा थेट परिणाम पाणीपुरवठ्यावर होतो. हातखंबा परिसरात देखभाल-दुरुस्तीच्या कामासाठी वीजपुरवठा बंद करण्याची आवश्यकता असल्यास त्याचे नियोजन नागरिकांच्या दैनंदिन वेळापत्रकाचा विचार करून करणे अपेक्षित आहे. सकाळच्या वेळेतच वीजखंडित करण्याऐवजी सकाळी ११.३० ते बारा नंतर दुरुस्तीची कामे हाती घ्यावीत, अशी मागणी यापूर्वीही महावितरणच्या अभियंत्यांकडे करण्यात आल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. मात्र, या सूचनेनंतरही सकाळच्या सत्रातच वीजपुरवठा खंडित होत असेल, तर नागरिकांच्या अडचणीं महावितरण विभाग वाढवीत आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मेंटेनन्सच्या नावाखाली नियोजित वीजखंडित करण्यापूर्वी पर्यायी वीजपुरवठ्याची शक्यता का तपासली जात नाही, याचेही उत्तर आता महावितरणने द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
दुष्काळी सूचनांचे काय?
एकीकडे ऑक्टोबरच्या उन्हाचा कडाका वाढलेला असताना दुसरीकडे वीजपुरवठा खंडित होणे नागरिकांसाठी दुहेरी संकट ठरत आहे. दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महावितरणने स्वतःच तांत्रिक यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. शेतीसह सर्व ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यास, वीजखंडित झाल्यास पर्यायी व्यवस्थेतून किंवा तातडीने दुरुस्ती करून तो पूर्ववत करण्यास सांगण्यात आले आहे. कामात हयगय करणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याच्याही सूचना आहेत. मग या सूचना स्थानिक पातळीवर कितपत पोहोचतात आणि त्यांची अंमलबजावणी किती गांभीर्याने होते, हा खरा प्रश्न आहे. वरिष्ठ पातळीवर ‘वीजपुरवठा सुरळीत ठेवा’चे आदेश आणि प्रत्यक्षात नागरिकांच्या सोयीच्या वेळेतच वीजखंडित या विसंगतीकडे महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.
स्थानिक अभियंत्यांना स्पष्ट सूचना देण्याची गरज
दुष्काळी परिस्थितीत वीज ही केवळ घरगुती गरज राहिलेली नाही; ती पाणीपुरवठा, शेती आणि दैनंदिन जीवनाची अत्यावश्यक कडी बनली आहे. त्यामुळे केवळ ‘मेंटेनन्स’चे वेळापत्रक ठरवून जबाबदारी संपत नाही. दुरुस्तीचे काम आवश्यक आहे की केवळ सोयीसाठी वीज बंद केली जात आहे, याचे उत्तरदायित्वही निश्चित झाले पाहिजे. नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी कामांचे वेळापत्रक बदलणे, पर्यायी स्रोत उपलब्ध असल्यास त्याचा वापर करणे आणि अत्यावश्यक दुरुस्ती वगळता अनावश्यक वीजखंडित टाळणे, एवढी साधी अपेक्षा आहे. रत्नागिरी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्थानिक पातळीवर कार्यरत अभियंते आणि कर्मचाऱ्यांना याबाबत स्पष्ट सूचना देऊन दुष्काळी परिस्थितीत वीजपुरवठा हा ‘सुविधा’ नव्हे, तर नागरिकांच्या जगण्याशी जोडलेली अत्यावश्यक सेवा आहे, याची जाणीव करून देण्याची गरज आहे.


