(संगमेश्वर / प्रतिनिधी) :
संगमेश्वर तालुका शिक्षण संस्था चालक संघाच्या नूतन कार्यकारिणीची निवड नुकतीच दादासाहेब सरफरे विद्यालयाच्या संस्था कार्यालयात झालेल्या सभेत करण्यात आली. सोनवी घडघडी परिसर शिक्षण प्रसारक मंडळ, सोनवडे संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर तुकाराम सनगरे यांची संघाच्या अध्यक्षपदी, तर बुरंबी पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष प्रताप नारायण देसाई यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. अभ्युदय शिक्षण प्रसारक प्रचितगड करभाटले मंडळाचे विनय होडे यांची सचिवपदी निवड करण्यात आली.
नूतन उपाध्यक्ष प्रताप नारायण देसाई यांनी यावेळी बोलताना सांगितले की, नूतन कार्यकारिणीवर सोपविण्यात आलेली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडत तालुक्यातील शिक्षण संस्थांच्या विविध प्रश्नांना संघटित व्यासपीठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच शैक्षणिक क्षेत्रातील सकारात्मक बदलांना चालना देण्याबरोबरच संस्था चालकांमध्ये समन्वय वाढविण्यासाठी संघाच्या माध्यमातून प्रभावीपणे काम करण्यात येईल.
नवनिर्माण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अभिजित हेगशेट्ये यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. संगमेश्वर तालुक्यातील शिक्षण संस्थांसमोरील विविध शैक्षणिक, प्रशासकीय तसेच पायाभूत सुविधांशी संबंधित प्रश्नांवर संघाच्या माध्यमातून प्रभावीपणे काम करण्याची मोठी जबाबदारी नूतन कार्यकारिणीवर असल्याचे त्यांनी सांगितले. अनुभवसंपन्न नेतृत्व, संघटन कौशल्य आणि शैक्षणिक विकासाची तळमळ असलेले नूतन पदाधिकारी या जबाबदारीला निश्चितच योग्य न्याय देतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
संगमेश्वर तालुक्यातील शिक्षण क्षेत्रातील मान्यवर शरद बाईत, दिनेश जाधव आणि भाई शिंदे यांनी नूतन कार्यकारिणीच्या निवडीचे स्वागत करून पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. बुरंबी पंचक्रोशी शिक्षण संस्थेसह संगमेश्वर तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रातून नूतन कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.


