(रत्नागिरी / प्रतिनिधी)
जयगड येथून कोल्हापूरच्या दिशेने जात असलेला गॅस टँकर हातखंबा गावच्या वळणावर वेगात आल्याने अनियंत्रित होत पलटी झाला. २८ जुलै रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला असून, टँकरमधून गॅस गळती होऊ लागल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते. या घटनेत टँकर चालक सय्यद खाजा पाशा (वय ५०, रा. हैद्राबाद) हे जखमी झाले असून, त्यांच्या निष्काळजीपणामुळे अपघात झाल्याचा ठपका ठेवत त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गॅस टँकर (क्र. एपी ३९ टीएफ ०१५७) भरधाव वेगाने चालवण्यात आल्याने चालकाचे नियंत्रण सुटले व टँकर हातखंबा गावाच्या वळणावर उलटला. अपघातानंतर गॅस गळती सुरू झाली, मात्र सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. अपघाताची माहिती मिळताच गावचे पोलीस पाटील अंकित सखाराम तारवे (वय ३२, रा. हातखंबा तारवेवाडी) यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला असून, सय्यद खाजा पाशा यांच्यावर भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम १२५(अ), २८१ व मोटार वाहन कायदा कलम १८४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेनंतर पोलिस प्रशासनाने खबरदारीचे उपाय म्हणून वाहतूक काही काळासाठी थांबवली होती. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र टँकरचे मोठे नुकसान झाले आहे. घटनास्थळी पोलीस व आपत्कालीन यंत्रणा सतर्क राहून परिस्थिती नियंत्रणात आणण्यात यशस्वी ठरल्या.