(रत्नागिरी / वार्ताहर)
लोटे परशुराम इंडस्ट्रीज असोसिएशन येथे जिल्हा उद्योग मित्र समितीची महत्त्वपूर्ण बैठक रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनुज जिंदाल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीस फेडरेशन ऑफ रत्नागिरी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पटवर्धन, लोटे परशुराम इंडस्ट्रीज असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी राजकुमार जैन यांच्यासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी, उद्योजक आणि उद्योग संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
बैठकीत लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीतील विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. औद्योगिक क्षेत्रातील रस्त्यांची दुरुस्ती, वाशिष्टी नदीवरील बंधारा उभारणी, स्ट्रीट लाईट व्यवस्था, नियमित वीज व पाणीपुरवठा, सांडपाणी वाहिन्यांची स्वच्छता आणि सुरक्षितता या मूलभूत सुविधांबाबत उद्योजकांनी समस्या मांडल्या.
तसेच ईएसआयसी सेवा दवाखान्यातील अपुऱ्या सुविधा, ईएसआयसी रुग्णालयासाठी जागा उपलब्ध करून देणे, गाणेखडपोली पुलाचे रखडलेले काम, पेट्रोल-डिझेल बॅरलमधून उपलब्ध न होण्याने निर्माण झालेल्या अडचणी आणि लघुउद्योजकांसाठी पर्यायी उपाययोजनांबाबतही चर्चा झाली. मैत्री पोर्टलच्या कार्यक्षमतेसंदर्भातील प्रश्नही यावेळी उपस्थित करण्यात आले.
फेडरेशन ऑफ रत्नागिरी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पटवर्धन यांनी उद्योग क्षेत्रासमोरील विविध अडचणींकडे जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. त्यावर जिल्हाधिकारी मनुज जिंदाल यांनी संबंधित विभागीय अधिकाऱ्यांकडून कामांचा आढावा घेत सर्व प्रलंबित प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. तसेच उद्योजकांना कोणतीही अडचण असल्यास थेट जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले.
बैठकीस लोटे परशुराम इंडस्ट्रीज असोसिएशनचे संचालक शिरीष चौधरी, रविंद्र कदम, मंदार अडिवरेकर, राजेश तिवारी, दत्तात्रय जाधव, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक तथा जिल्हा उद्योग मित्र अ. आजगेकर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या प्रादेशिक अधिकारी वंदना करमाळे, महावितरणचे अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव, सहाय्यक कामगार आयुक्त अमित जाधव, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे अधिकारी मोरेश्वर धवल, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाचे उपसंचालक एन. वेले, खेडच्या उपविभागीय अधिकारी वैशाली पाटील, तहसीलदार सुधीर सोनवणे, नॉर्थ रत्नागिरी इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अनिल त्यागी, शशी देसाई, तसेच दापोली उद्योजक व्यावसायिक संस्थेचे अध्यक्ष अरुण नरवणकर आणि प्रवीण कलाल उपस्थित होते.
याशिवाय महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, ईएसआयसी विभागाचे अधिकारी, विविध उद्योगांचे प्रतिनिधी आणि व्यवस्थापक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्योग क्षेत्रातील समस्या सोडविण्यासाठी प्रशासन आणि उद्योजकांमधील समन्वय अधिक मजबूत करण्यावर बैठकीत भर देण्यात आला.

