(रत्नागिरी)
जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेतून राबवण्यात आलेल्या ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या जलसंवर्धन उपक्रमांतर्गत अवघ्या १५ दिवसांत राज्यभर व इतर राज्यांमध्ये एकूण ४,५९८ कच्चे वनराई बंधारे उभारण्यात आले. ७ डिसेंबर ते २१ डिसेंबर या कालावधीत हा उपक्रम लोकचळवळीचे स्वरूप धारण करत यशस्वीरीत्या राबवण्यात आला.
या उपक्रमासाठी रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांनी आपल्या अनुयायांना जलसंवर्धनासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार गावोगावी ओढे, नाले व लहान नद्यांवर वनराई बंधारे बांधून भूजल पातळी वाढविण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण कार्य करण्यात आले. एवढ्या अल्प कालावधीत एवढ्या मोठ्या प्रमाणावर जलसंवर्धनाचे काम होणे हे सहजसाध्य नसून, या उपक्रमाने सर्वत्र लक्ष वेधले आहे.
विशेषतः मार्च महिन्यापासून तीव्र पाणीटंचाई जाणवणाऱ्या मराठवाडा विभागात या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला. शेतीसाठी तसेच जनावरांसाठी पाणी उपलब्ध व्हावे, भूगर्भातील जलसाठा वाढावा या उद्देशाने मराठवाडा उपपीठामार्फत अनेक गावांमध्ये वनराई बंधारे उभारण्यात आले.
जलप्रवाहांवर वनराई बंधारे उभारणे हे श्रमाचे आणि कष्टाचे काम असतानाही, रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या अनुयायांनी समाजहितासाठी एकत्र येत हे कार्य आनंदाने पूर्ण केले. या उपक्रमाचे रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत, राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, जिल्हा परिषद रत्नागिरीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, आमदार भास्कर जाधव आदी मान्यवरांनी विशेष कौतुक केले आहे.
उपपीठनिहाय उभारलेले वनराई बंधारे :
- उपपीठ मराठवाडा : १,६६०
- उत्तर महाराष्ट्र : ५९४
- पीठ नाणीजधाम : ४८९
- पूर्व विदर्भ : ४६५
- पश्चिम महाराष्ट्र क्षेत्र : ४४८
- उपपीठ तेलंगणा : २६४
- मुंबई विभाग : १८१
- उपपीठ गोवा : १६९
- उपपीठ पश्चिम विदर्भ : १४६
- उपपीठ गुजरात : ८०
- छत्तीसगड : ७३
- मध्यप्रदेश : २८
- उपपीठ जम्मू-काश्मीर : १
एकूण ४,५९८ वनराई बंधारे उभारून जलसंवर्धनाच्या दिशेने ठोस पाऊल टाकण्यात आले आहे.
(फोटो : हातखंबा येथे रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या अनुयायांनी उभारलेला वनराई बंधारा)

