(गणपतीपुळे / वैभव पवार)
भारतीय बौद्ध महासभा ग्रामशाखा निवेंडी-समतानगर यांच्या वतीने आयोजित वर्षावास प्रवचनमालिकेतील १४ वे पुष्प रविवारी, ४ ऑक्टोबर रोजी निवेंडी-समतानगर येथील महाबोधी विहारात उत्साहात संपन्न झाले. ग्रामशाखेचे अध्यक्ष आयु. दिवाकर कदम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला तालुका कार्यकारिणीचे पदाधिकारी, माजी श्रामणेर व बौद्धाचार्य, ग्रामशाखा पदाधिकारी तसेच धम्म बांधव-भगिनींची मोठी उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रारंभी ग्रामशाखेचे सचिव मीनानाथ कदम यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रवचनकार, लांजा तालुका शाखा संस्कार विभागाचे उपाध्यक्ष, माजी श्रामणेर तथा बौद्धाचार्य आयु. आदेश जाधव, कार्यक्रमाचे अध्यक्ष आयु. दिवाकर कदम, तालुका कार्यकारिणीचे पदाधिकारी, तालुक्यातील माजी श्रामणेर व बौद्धाचार्य आणि ग्रामशाखा पदाधिकाऱ्यांनी महाबोधी विहारातील आदर्शांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन केले. त्यानंतर सामुदायिकरित्या त्रिसरण पंचशीलाचे ग्रहण करण्यात आले.
ग्रामशाखेच्या वतीने प्रवचनकार, तालुका शाखेचे पदाधिकारी तसेच तालुक्यातील माजी श्रामणेर व बौद्धाचार्य यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. तसेच तालुका शाखेच्या वतीने संस्कार विभागाचे सचिव स्वप्नील पवार यांनी ग्रामशाखेचे तसेच महिला मंडळाच्या अध्यक्ष व सचिवांचे पुष्प देऊन स्वागत केले. यावेळी मुंबई कमिटीचे अध्यक्ष नागेश कदम, निवेंडी गावच्या सरपंच रविना कदम आणि सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्या अध्यक्षा स्वाती कदम यांची उपस्थिती होती.
जिल्हा पाली विभागाचे उपाध्यक्ष तथा तालुका संघटक आयु. दिलीप वासनिक यांनी मार्गदर्शन करताना वर्षावासाचे महत्त्व विशद करून उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. वर्षावास कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल त्यांनी ग्रामशाखेचे अभिनंदन केले. बौद्ध संस्कृतीचा वारसा आणि इतिहास सम्राट अशोककालीन स्तंभ, शिलालेख व लेण्यांमध्ये लपलेला असून तो समजून घेण्यासाठी अशोककालीन धम्मलिपी व पाली भाषा समजून घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. स्वतः चालवीत असलेल्या धम्मलिपीच्या नि:शुल्क वर्गात जास्तीत जास्त लोकांनी प्रवेश घ्यावा, तसेच मुंबई विद्यापीठातून पाली भाषेचे शिक्षण घ्यावे, त्यासाठी वयाची अट नाही, असे आवाहन त्यांनी केले.
यानंतर ‘डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोधिसत्व कसे?’ या विषयावर आयु. आदेश जाधव यांनी प्रवचनातून विचार मांडले. बाबासाहेबांच्या जीवनचरित्राचा अभ्यास केल्यास त्यांच्या बालपणीच्या अत्यंत बिकट परिस्थितीतही शिक्षण घेण्याच्या प्रवासात रामजी बाबांचे व आत्तेचे मोठे योगदान असल्याचे त्यांनी सांगितले. वर्गाबाहेर बसून शिक्षण घेणारे बाबासाहेब पुढे देशाचे संविधानकर्ते झाले. विविध क्षेत्रांतील त्यांचे अफाट ज्ञान आणि बुद्धिमत्ता यामुळे त्यांनी देशाच्या इतिहासात अढळ स्थान निर्माण केले, असे त्यांनी नमूद केले.
तथागतांनी सांगितलेल्या शील, दान, उपेक्षा, ऐहिक सुखाचा त्याग, वीर्य म्हणजे हाती घेतलेले काम पूर्ण करण्याचा ध्यास, शांती, सत्य, अधिष्ठान आणि करुणा या दसपारमितांचे सविस्तर व उदाहरणांसह विवेचन आयु. जाधव यांनी केले. बाबासाहेबांनी आपल्या अखंड आयुष्यात या पारमितांचे पालन केले. त्यांचा स्वार्थत्याग आणि दलितांना सन्मानाने जीवन जगण्यासाठी दिलेला लढा अतुलनीय असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या त्यागामुळे आपल्याला मानवी जीवन मिळाले, असे नमूद करत बाबासाहेबांचे शीलपालन, पराकोटीचा त्याग, मानवतेसाठीचा नि:शस्त्र लढा, दिनांचे कैवारी आणि बुद्धिमत्तेचा महामेरू या गुणांमुळेच ते बोधिसत्व असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी भारतीयांना समानता, बंधुता आणि स्वातंत्र्याची देण दिली, असेही त्यांनी सांगितले. अभ्यासपूर्ण, सहज आणि सोप्या भाषेतील प्रवचनातून त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी बाबासाहेबांच्या जीवनावरील गीत सादर करून त्यांनी उपस्थितांना भावनाविवश केले. समतानगर ग्रामशाखेने उभारलेल्या बुद्धविहाराच्या रचनेचे त्यांनी कौतुक केले. तसेच कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या तरुण आणि महिला वर्गाचे विशेष अभिनंदन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात आयु. दिवाकर कदम यांनी सर्वांचे अभिनंदन करून आभार मानले. तालुका शाखेच्या वतीने संस्कार विभागाचे सचिव स्वप्नील पवार यांनी उपस्थितांचे आभार मानले आणि कार्यक्रमाचे नेटके आयोजन केल्याबद्दल ग्रामशाखेचे कौतुक केले. सरणत्तय गाथेने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामशाखेच्या वतीने सभासद आयु. यश चंद्रकांत कदम आणि तालुका शाखेच्या वतीने संस्कार विभागाचे सचिव आयु. स्वप्नील पवार यांनी केले.
ग्रामशाखेने प्रामुख्याने स्वखर्चावर बांधलेल्या बुद्धविहाराचे उद्घाटन मे २०२६ मध्ये करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर ग्रामशाखेतील माता सावित्रीबाई फुले महिला मंडळाने वर्षावास कार्यक्रमाच्या खर्चाची जबाबदारी स्वीकारून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. याबद्दल ग्रामशाखा आणि महिला मंडळाचे तालुका शाखेच्या वतीने विशेष कौतुक व अभिनंदन करण्यात आले.
या कार्यक्रमाला तालुका शाखेचे अध्यक्ष सुनील पवार, संस्कार विभाग तालुका विभाग उपाध्यक्ष प्रितम सावंत, संस्कार विभाग तालुका सचिव स्वप्नील पवार, हिशोब तपासणीस नंदकुमार यादव, संरक्षण विभाग सचिव प्रमोद जाधव, सचिव अशोक यादव, तालुका संघटक तथा जिल्हा पाली भाषा उपाध्यक्ष दिलीप वासनिक सर, तालुका संघटक सुधीर जाधव व दिलीप जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. स्थानिक ग्रामशाखेसह तालुक्यातील धम्म बंधू-भगिनींचीही मोठी उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या शेवटी ग्रामशाखेच्या वतीने सर्व उपस्थितांसाठी भोजनदान करण्यात आले.


