(रत्नागिरी /प्रतिनिधी)
रत्नागिरी येथील प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. संघमित्रा फुले यांच्या प्रशासकीय कार्याची आणि आरोग्यसेवेतील योगदानाची राज्य शासनाने दखल घेतली असून, त्यांची आरोग्य सेवेतील उपसंचालक या वरिष्ठ पदावर पदोन्नती करण्यात आली आहे. त्यांच्या पदोन्नतीमुळे आरोग्य विभागातील सहकारी आणि रत्नागिरीतील नागरिकांकडून आनंद व्यक्त केला जात आहे.
प्रादेशिक मनोरुग्णालयाचे अधीक्षक म्हणून कार्यरत असताना डॉ. फुले यांनी रुग्णालयातील प्रशासकीय व्यवस्था अधिक सक्षम करण्यासोबतच रुग्णसेवेला केंद्रस्थानी ठेवले. मनोरुग्णांवर केवळ वैद्यकीय उपचार न करता त्यांच्या सामाजिक पुनर्वसनावरही भर देत विविध उपक्रम राबविण्यात त्यांनी पुढाकार घेतला. रुग्णालयातील शिस्त, सेवा-सुविधा आणि रुग्णांच्या दैनंदिन गरजांकडे अधिक संवेदनशीलतेने पाहण्याची कार्यपद्धती त्यांनी रुजवली. उपचारासोबतच रुग्णांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आवश्यक वातावरण निर्माण करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना विशेष महत्त्व प्राप्त झाले.
डॉ. फुले यांच्या प्रशासकीय कार्याची शासनाने घेतलेली दखल म्हणून ही पदोन्नती पाहिली जात आहे. मात्र, त्यांना अद्याप नव्या पदाची पदस्थापना देण्यात आलेली नाही. प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर राज्य शासनाकडून त्यांच्या नव्या नियुक्तीचे अधिकृत आदेश जारी होण्याची शक्यता आहे. आदेश प्राप्त झाल्यानंतर त्या उपसंचालकपदाचा पदभार स्वीकारतील. दरम्यान, डॉ. फुले यांच्या पदोन्नतीबद्दल प्रादेशिक मनोरुग्णालयातील सहकारी तसेच नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, त्यांच्या पुढील प्रशासकीय कारकिर्दीस शुभेच्छा दिल्या आहेत.


